शिवरायांच्या कालगणनेस 350 वर्षे पूर्ण..

शिवरायांच्या कालगणनेस 350 वर्षे पूर्ण..
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास व त्यांनी सुरू केलेल्या राज्याभिषेक शक कालगणनेला यंदा 350 वर्षे पूर्ण होत आहेत. या कालगणनेचा उल्लेख तत्कालीन भोर संस्थानातील राजगड, तोरण्यासह गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये आढळला आहे. त्यामुळे या दस्ताला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 6 जून 1674 (शालिवाहन शके 1596, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी) रोजी राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी शिवरायांनी 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली.

मात्र, नंतर ही कालगणना काळाच्या ओघात मागे पडून सरकारी कारभारात पुन्हा 'फसली' व इंग्रजी कालगणना सुरू झाली. असे असताना तत्कालीन भोर संस्थानातील (सध्याचे वेल्हे, हवेली, मुळशी, भोर तालुके) गावांतील जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये 1946 ते 1950 पर्यंत राजशक कालगणनेचा उल्लेख आहे. शिवरायांच्या कालगणनेचा भोर संस्थांनाने गौरव केला असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.
छत्रपती शिवरायांनी श्रीरायरेश्वरावर 1645 साली हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. या ऐतिहासिक घटनेस तीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी भोर संस्थांनचे राजे रघुनाथराव पंतसचिव यांनी 1945 मध्ये नसरापूर -चेलाडी फाट्यावर मराठा स्मारक स्तंभ उभारला.

स्तंभावर श्रीशिवाजी महाराज मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेत आहेत, असे शिल्प आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकापासून 'स्वस्ति श्री राज्याभिषेक शक' असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज व त्यानंतरच्या छत्रपतींच्या सरकारी कागदपत्रात या कालगणनेचा उल्लेख आहे. मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंद शोध मोहीम शासनाने राबवली. या कुणबी नोंदी जिल्ह्याच्या संकेत स्थळावर गाव, तालुकानिहाय उपलब्ध आहेत. बि—टिश राजवटीपासून 1950 -60 पर्यंत बहुतेक नोंदी मोडी व काही नोंदी देवनागरी लिपीत आहेत.

तत्कालीन भोर संस्थानातील अनेक गावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरच्या मुख्य पानावर राजशक कालगणनेचा उल्लेख आढळला आहे. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वर्षी 273वे राजशक असा उल्लेख आहे. सोबत 'फसली' व इंग्रजी कालगणनेचाही उल्लेख आहे. 1950 नंतर मात्र, राजशकऐवजी फक्त इंग्रजी कालगणनेचा उल्लेख आहे.

-डॉ. नंदकुमार मते, इतिहास अभ्यासक.

हिंदवी स्वराज्याचा देशभर सर्वदूर विस्तार होण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक शक कालगणना सुरू केली. त्यांनी सुरू केलेले राज्याभिषेक शक आजही राष्ट्रीय बाण्याची प्रेरणा देत आहे.

– प्रदीप खुटवड, शिवकालीन शस्त्र अभ्यासक.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news