पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील प्रचलित ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीच्या दरात 34 टक्के आणि मुकादमाच्या कमिशनमध्ये एक टक्क्यांनी दरवाढ करण्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच वाढीव दराची अंमलबजावणी ऑक्टोंबर 2023 पासून म्हणजे पुर्वलक्षी प्रभावाने होणार आहे. तसेच पुढील तीन वर्षांसाठी हा करार राहणार असून त्याचा फायदा राज्यातील दहा लाख ऊस तोडणी मजुरांना होणार आहे.
साखर संकुल येथील आवारात दरवाढीवर यशस्वी तोडगा निघताच रात्री ऊस तोडणी कामगारांनी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. या निर्णयामुळे ऊस तोड कामगारांची मजुरी 274 रुपयांवरुन 367 रुपये होणार आहे. म्हणजे प्रति टनास सुमारे 93 रुपयांची दरवाढ मिळाली आहे. तर सध्या ऊस तोडणी मजुरीवर मुकादमांना असणारे 19 टक्के होते. ते आता 20 टक्के करण्यात आले आहे. साखर संकुल येथील राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या कार्यालयात गुरुवारी (दि.4) सायंकाळी सहा वाजता संयुक्त बैठक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरु झाली.
बैठकीस राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, जयंत पाटील, प्रकाश सोळंके, हर्षवर्धन पाटील, प्रतापराव ओव्हळ, कल्याणराव काळे, प्रकाश आवाडे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ हे साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर ऊस तोडणी कामगार संघटनांच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण आठ ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ज्येष्ठ नेते शरद पवार बैठकीस उपस्थित राहिल्याबद्दल मनस्वी आनंद झाला.
हेही वाचा