

पुणे: लग्नाच्या जाळ्यात पुरुषांना अडकवून त्यांनी दिलेल्या दागिन्यांचा अपहार करण्यास सांगून आणि तमाशात नाचण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. अशा प्रकारची टोळी चालविणाऱ्या दोन महिलांवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1 लाख 80 हजार रुपयांसाठी मागणी केली व सतत धमक्या दिल्या. मंगल आणि सोनाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही 32 वर्षांची आहे. तिला पाच मुले आहेत. (Latest Pune News)
तक्रारदार महिलेच्या पतीचे 2022 मध्ये निधन झाले आहे. पुण्यात कामाच्या शोधात असताना तिच्या ओळखीच्या महिलेने तिला राहाता, अहमदनगर येथे काम मिळवून देते, असे सांगितले. तेथे तिची ओळख संशयित मंगल अकुंश पठारे हिच्याशी करून देण्यात आली.
पठारे हिने तिच्याकडून लग्न जमवण्याचे आणि लग्नानंतर मिळणारे दागिने ताब्यात घेण्याचे काम करण्याचा दबाव टाकला. तिने नकार दिल्यावर आरोपींनी तिच्या दोन मुलांना गुजरात येथे विकून मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी तिचे रेखा नावाने बनावट आधार कार्ड तयार केले.
नंतर चाळीसगाव येथील विलास नावाच्या व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर मिळालेले सोन्याचे दागिने महिलेला बोलवून काढून घेण्यात आले. विलास नावाच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून तक्रारदार महिलेला अटक झाला. लग्नानंतर पीडित महिलेने तिच्या बहिणीकडे दिलेली मुले आरोपीने परस्पर स्वतःकडे ठेवून घेतली.
तसेच तक्रारदार महिलेच्या बोगस लग्नाच्या गुन्ह्यात जामीन देण्यासाठी एक लाख 80 हजार खर्च झाल्याचे सांगितले. त्या एक लाख 80 हजारांच्या बदल्यात तिने खंडणी स्वरूपात मागितले. न दिल्यास मुलांना विकून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने मुलांना ओलिस ठेवून पीडितेला जामखेड परिसरातील तमाशाच्या फडात नाचण्यास भाग पाडले.
तमाशात काम करत असताना तिची अन्य मुलींशी ओळख झाली. त्यातून असे स्पष्ट झाले की, आरोपी पठारे व सोनाली नगरकर या दोघी अनेक मुलींना विवाहाचे आमिष दाखवून आणतात आणि त्यांच्याकडून बेकायदा कामे करून घेत असल्याचे लक्षात आले. या सर्व प्रकारानंतर पीडितेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी महिलांविरोधात व त्या रॅकेटविरोधात तक्रार दिली. दरम्यान, हा गुन्हा राहाता येथे घडल्याने अहिल्यानगर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे.