मंदिरे उघडण्याची मागणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच : अजित पवार | पुढारी

मंदिरे उघडण्याची मागणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच : अजित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या ग्रामीण भागात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना भावनिक मुद्दा पुढे करून मंदिरे सुरू करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मंदिरे सुरू करण्याचा  प्रयत्न केला जात असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली.

राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी विद्याधर अनास्कर यांची निवड झाली असून त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ३) रोजी पदाचा पदभार मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयात स्वीकारला.

यावेळी अजित पवार यांनी सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी सहकार कायद्यामध्ये जे- जे बदल आवश्यक आहेत त्याची शिफारस परिषदेने तात्काळ करावी, सहकार परिषदेसाठी राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत त्याही सादर करण्याच्या सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याच दरम्यान अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.

मंदिरे सुरू करण्याच्या मागणीतून विरोधकांचा निवडणुकांमध्ये जास्तीत- जास्त सदस्य निवडून येण्यासाठी त्यांचा अस्तित्व दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला हे साध्य करता येते हा त्यांचा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह काही लोकांची नावे वगळल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, यावर कोणताही निर्णय अथवा चर्चा झालेली नाही. गेल्या आठ-दहा दिवसांत याबाबत येत असलेले वृत्त चुकीचे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, मी स्वतः आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे आदिंनी भेट घेऊन राज्यातील सद्यस्थितीवर नुकतीच चर्चा केलेली आहे.

राज्यातील शाळा कधी सुरू होणार?

देशात काही राज्यातील शाळा सुरू झाल्या असून आपल्या राज्यात त्या कधी सुरू होणार? यावर ते म्हणाले, शाळा सुरू करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. दिवाळी संपल्यावर शाळा सुरू कराव्यात आणि ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्हीटी रेट शून्य टक्के आहे अशा ठिकाणच्या शाळा सुरू करण्याचा मतप्रवाह आहे. मात्र उद्धव ठाकरे हे ट्रान्सफोर्सच्या तज्ञांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील.

राज्य बँकेवर ईडीची धाड पडल्याचे वृत्त निराधार असल्याचे म्हणत अशा प्रकारच्या निराधार बातम्यांनी जनतेच्या मनातील असलेली माध्यमांची विश्वासार्हता कोणी कमी करू नये असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याबद्दल ते म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांच्या मनात आता कोरोनाची भिती उरलेले नाही. मास्क वापरला जात नाही, नियम पाळले जात नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही ते पाळले जात नाही.

या स्थितीत काहीजण राजकारण करून सण साजरे करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे कुठेतरी थांबले पाहिजे. अन्यथा कोरोनाची तिसरी लाट आल्यास ये रे माझ्या मागल्याप्रमाणे सर्व काही बंद करण्याची वेळ शासन, प्रशासनावर जनतेने येऊ देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचलंत का?

Back to top button