पिंपरी : लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीचा काढला काटा | पुढारी

पिंपरी : लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीचा काढला काटा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवर जात असलेल्या महिलेचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना 9 ऑगस्ट रोजी तळेगाव येथे घडली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रियकरानेच सुपारी देऊन महिलेचा काटा काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. बजरंग मुरलीधर तापडे (45, रा. तळेगाव दाभाडे, पुणे. मूळ रा. बीड), पांडुरंग ऊर्फ सागर बन्सी हारके (35, रा. मोशी, पुणे. मूळ रा. बीड), सचिन प्रभाकर थिगळे (30, रा. बुलढाणा), सदानंद रामदास तुपकर (26, रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बजरंग तापडे आणि मयत महिला यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, महिलेने बजरंग याच्याकडे लग्नाबाबत तगादा लावला होता. बजरंग हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. त्याला या महिलेसोबत लग्न करणे शक्य नसल्याने त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने पांडुरंग हारके याला सात लाख रुपयांची सुपारी दिली. त्यातील चार लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिले. पांडुरंग याने त्याचा ओळखीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी सचिन याला हे काम दिले. आळंदी येथे झालेल्या मिटिंगमध्ये पांडुरंग याने सचिन याला महिलेचा फोटो, नाव, पत्ता, जाण्या-येण्याचा मार्ग अशी सर्व माहिती दिली.

आरोपी सचिन याने त्याचा मित्र सदा याच्यासोबत मिळून महिलेच्या मार्गाची, तिच्या वडिलांच्या दुकानाची रेकी केली. खून केल्यानंतर पळून जाण्याचा मार्ग कोणता असेल याचीही आरोपींनी तयारी केली. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी सकाळी महिला तिच्या वडिलांच्या दुकानात दूध पोहोचवून घरी जात असताना आरोपींनी तिचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केला. तळेगाव दाभाडे पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट पाचने समांतर तपास करून तिघांना अटक केली. तर,तर तळेगाव दाभाडे पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली आहे.

Back to top button