

खडकवासला: तोरणागडाच्या पायथ्याच्या घिसर (ता. राजगड) येथील रायगड मार्गावरील श्री जुगाईदेवी मंदिरात वधुवरांना लग्नाची हळद लावून घनदाट जंगलातील पायवाटेने विवाहस्थळाकडे परतणाऱ्या वऱ्हाडावर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यात वधू-वरासह 30 जण जखमी झाले.
त्यातील 9 जणांची जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 30) रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
संकेत शिंदे व संध्याराणी धिंडले यांचे गुरुवारी दुपारी लग्न होते. वधू व वर दोघेही घिसर गावातील असल्याने महिला, मुली मोठ्या संख्येने हळदी समारंभासाठी जुगाईदेवी मंदिरात जमा झाल्या होत्या. चोहोबाजूंनी जंगल असल्याने झाडावर, खडकावर मधमाश्यांचे पोळे आहेत.
जुगाई मंदिरात वधू-वरांना लग्नाची हळद लावण्याची प्रथा आहे. वधू-वरांना हळद लावून तीस-पस्तीस महिला व काही पुरुष अरुंद पायवाटेने गावाकडे चालले होते. त्यावेळी मधमाश्यांनी अचानक वऱ्हाडावर हल्ला केला. वाट दिसेल तिकडे जीव वाचवण्यासाठी महिला, मुली, मुले पळत सुटले. वधू संध्याराणी व वर संकेत यांच्या हातांचा मधमाश्यांनी चावा घेतला.
दोघांनी प्रसंगावधान राखून शालीने डोके-तोंड झाकून घेतले. त्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली नाही. मधमाश्यांच्या हल्ल्यात स्वाती किरण बांदल (वय 28), माया अनिल देवगिरीकर (वय 35), छाया रमेश शिंदे (वय 35), सारिका रमेश पारठे (वय 32), गणेश गेणू शिंदे (वय 23), कमल संदीप शिंदे (वय 35), नितीन ज्ञानोबा धिंडले (वय 38), विठ्ठल निवृत्ती शिंदे (वय 30), कविता राजेंद्र भुरुक (वय 30) हे गंभीर जखमी झाले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईट म्हणाले, मधमाश्यांनी चावा घेतल्यानंतर एक दीड तासानंतर गंभीर जखमी रुग्ण रुग्णालयात आले. मधमाश्यांनी मोठ्या प्रमाणावर चावा घेतल्याने बहुतेक रुग्णांना उलट्या, मळमळ सुरू होती. त्यांच्यावर तातडीने आवश्यक उपचार सुरू केले आहेत.