

पुणे, पुढारी वृत्तसेवा : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे हद्दीत दहशत माजविणार्या चुहा गँगचा महोरक्या तौसिफ उर्फ चुहा याच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी तौसिक सह त्याच्या पाच साथीदारांना जेरबंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यानी दिली आहे.
तौसिफ ऊर्फ चुहा जमिर सय्यद , अझरुद्दीन दिलावर शेख (वय-22), ईशान निसार शेख (20), गणेश विजय भंडलकर (21) व कैफ आरीफ शेख (18, सर्व रा.कात्रज,पुणे) या आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन कोयते, मिरची पुड, लोखंडी रॉड, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी यांना खबर्या मार्फेत माहिती मिळाली होती की, चुहा गँगचा मुख्य सुत्रधार तौसिफ हा त्याचे साथीदारांसह सोमवारी संध्याकाळी कात्रज परिसरातील पतंगराव कदम बंगलाचे समोर सच्चाई माता डोंगरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एस शिंदे, कर्मचारी रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, तुळशीराम टेंभुर्णे, हर्षल शिंदे, राहूल तांबे त्यांचे पथकाने घटनास्थळी जाऊन त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केल्यानंतर आरोपी हे दरोडा टाकण्याचे तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे हे करत आहे.