यूपीच्या माजी आमदाराच्या मुलाला पुण्यात बेड्या; सामूहिक बलात्कार प्रकरण | पुढारी

यूपीच्या माजी आमदाराच्या मुलाला पुण्यात बेड्या; सामूहिक बलात्कार प्रकरण

पुणे : उत्तर प्रदेशात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराच्या मुलाला वाराणसी तसेच हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विष्णू विजय मिश्रा (वय 34) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विष्णू मिश्रा याचे वडील विजय मिश्रा हे उत्तर प्रदेशातील भदोईचे आमदार होते. सामूहिक बलात्कार प्रकरणात विष्णू मिश्रा सामील असल्याचे तपासात उघडकीस आले होते.

त्यानंतर तो पसार झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तपासादरम्यान मिश्राचे नातेवाइक पुण्यात राहत असल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाली होती. दहा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. त्यानंतर हडपसर पोलिसांच्या मदतीने पोलिस पथकाने मिश्रा याला अटक केली. त्याला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) दिली. त्यानंतर त्याला घेऊन पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले.

एक लाखाचे होते बक्षीस
आरोपी हडपसर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहायला होता. पसार झालेल्या आरोपीची माहिती कळविणार्‍यास उत्तर प्रदेश पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे वाराणसी पोलिसांच्या विशेष पथकातील सहायक आयुक्त शैलेश सिंग, पोलिस निरीक्षक श्रीवास्तव, उपनिरीक्षक अंगद यादव यांनी ही कारवाई केली.

Back to top button