26 lakh drug seizure Kondhwa
पुणे: कोंढवा भागात अफू बाळगणार्या राजस्थानातील एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 14 लाख 98 हजारांची अफू जप्त करण्यात आली. तर बिबवेवाडी भागात अंमली पदार्थविरोधी विभागाने कारवाई करून एकाकडून 11 लाखांचे मेफेड्रोन जप्त केले.
कोंढवा भागात अंमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी भैरवनाथ मंदिराजवळ एक जण थांबला असून, त्याच्याकडे अफू असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस कर्मचारी सचिन माळवे यांना मिळाली. (Latest Pune News)
त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी भागीरथराम बिष्णोई (वय 46, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याला पकडले. त्याच्याकडून 14 लाख 98 हजार रुपयांची अफू, पिशवी, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा 15 लाख चार हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बिष्णोई याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
बिबवेवाडी भागात अमली पदार्थविरोधी पथकाने आणखी एक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकाकडून 11 लाखांचे मेफेड्रोन जप्त केले. विठ्ठल ऊर्फ अण्णा कराडे (वय 57, रा. बिबवेवाडी) याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती आझीम शेख यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.
11 लाख 2 हजार रुपयांचे मेफेड्रोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मोबोइल असा 11 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस कर्मचारी योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेबाड यांनी ही कामगिरी केली.