पुणे : मुख्यमंत्र्याचा सत्कार सोडून माजी नगरसेवक धावले रुग्णाच्या मदतीला | पुढारी

पुणे : मुख्यमंत्र्याचा सत्कार सोडून माजी नगरसेवक धावले रुग्णाच्या मदतीला

पुणे, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यात आगमन झाले. त्‍यानंतर त्‍यांचा ताफा विमानतळावरून हडपसरकडे रवाना झाला. मात्र, वाहतुक कोंडीत सापडलेल्या रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या गाडीतून माजी नगरसेवक नाना भानगिरे थेट रस्त्यावर उतरले आणि रुग्णवाहिकेला वाट करून देत त्यांनी माणुसकी जपली.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच पुण्यात आले होते. त्यामुळे पंढरपूरला जाताना ह़डपसर गाडीतळ येथे माजी नगरसेवक भानगिरे यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वागताची जय्यत तयारीही केली होती. नियोजित वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री पुणे विमानतळावर आले. भानगिरे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागतही केले आणि मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसूनच ते हडपसरच्या दिशेने रवाना झाले. मात्र, विमानतळ रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दीत एक रुग्णवाहिका अडकली होती आणि तिला बाहेर काढण्यासाठी एक महिला प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा ताफा थांबला. प्रसंगावधान ओळखुन भानगिरे मुख्यमंत्र्याच्या गाडीतून तात्काळ उतरले.

पुढे स्वागतासाठी कार्यकर्ते आणि कुंटुबीय असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगत रुग्णवाहिकेला कोंडीतून सोडविण्यासाठी ते मागेच थांबले. पाच-दहा मिनिटात कोंडी सुटली आणि रुग्णवाहिका रुग्णालयाकडे मार्गस्थ झाली. एकिकडे मुख्यमंत्री हडपसरमध्ये पोहचले. मात्र, भानगिरेच सत्काराच्या कार्यक्रमाला नसल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. अखेर मुख्यमंत्र्यांनीच घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांचे कौतुकही केले.

एवढचे नाही तर आपण पुन्हा जाहीर कार्यक्रमासाठी नक्की हडपसरमध्ये येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भानगिरे यांनी थेट मुख्यमंत्र्याचा सत्कार सोडून रुग्णाला वाचविण्यास प्राधान्य दिल्याने उपस्थित नागरिकांमध्ये याचे कौतुक रंगले.

हेही वाचा  

Back to top button