वालचंदनगर : माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे मातृछत्र हरपले | पुढारी

वालचंदनगर : माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे मातृछत्र हरपले

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरिजाबाई विठोबा भरणे (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गिरिजाबाई यांना जिजी असे संबोधले जायचे. जिजिंना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड होती. प्रतिकूल काळात एकत्रित कुटुंब टिकवण्यामध्ये जिजिंचा मोलाचा वाटा होता. भरणे कुटुंबीयांचा आधारवड असलेल्या जीजी गेल्या काही दिवसांपासून किरकोळ आजाराने ग्रस्त होत्या.

दरम्यान शुक्रवारी (दि. १) त्यांनी आपला जीवन प्रवास थांबवला असून भरणे कुटुंबीयांसह तालुकाभरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा यांचे गेल्या दीड वर्षांपूर्वी निधन झाले असून आता आईचे छत्रही हरपल्याने भरणे मामा आई-वडीलांविना पोरके झाले आहेत. गिरिजाबाई यांच्या पश्चात रामचंद, आबासाहेब, मधुकर व दत्तात्रय ही चार मुले तर साळुबाई, कुसुम व हिराबाई अशा तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान गिरिजाबाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून दुपारी २ वाजता भरणेवाडी येथील निवासस्थानानजीक त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Back to top button