

पुणेः पुढारी वृत्तसेवा: पुणे शहर व ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने गावठी पिस्तुलासह पकडले. हेमंत ऊर्फ बबलू प्रताप धुमाळ (रा. सांगवी, बारामती) असे त्याचे नाव आहे. धुमाळ हा नुकताच मोक्काच्या गुन्ह्यातून सुटला आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत 16 जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्रतिस्पर्धी व्यक्तीकडून जिवाला धोका असल्याची भीती वाटत असल्याने त्याने बेकायदा पिस्तूल बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले.
विविध गुन्ह्यांत फरारी असलेल्या सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना, पोलिस कर्मचारी नामदेव रेणुसे व विजय पवार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती, की स्वारगेट एसटी डेपोमागे पुरंदर कॉम्प्लेक्स भिंतीजवळ कॅनॅाललगत मोक्कामधुन सुटून आलेला गुन्हेगार हेमंत ऊर्फ बबलु प्रताप धुमाळ हा थांबला असून, त्याच्या कमरेला पिस्तुल लावलेला आहे.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक नितीन कांबळे, कर्मचारी गणेश थोरात, गजानन सोनुने, नवनाथ राख यांच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आल्याची चाहूल लागताच त्याने पळ काढला. प्रसंगावधान राखत पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. चौकशी करून अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ पिस्तूल व काडतूस मिळून आले.
हेही वाचा