बेळगाव : नावग्यात मासे पकडण्यावरून वाद | पुढारी

बेळगाव : नावग्यात मासे पकडण्यावरून वाद

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: नावगे येथे दोन तरुणांमध्ये मासे पकडण्यातून वाद होऊन दोघांमध्ये हाणामारी झाली. परंतु, काही समाजकंटकांनी यालाही भाषावादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तसे काहीही नसून हा वैयक्तीक वाद असल्याचे स्पष्टीकरण कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रवींद्र गडादी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी नावगे येथे हनुमान पुतळा प्रतिष्ठापित केल्याच्या कारणातून मराठी-कन्नड असा वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पोलिसांनी त्यावर पडदा टाकला. मंगळवारी नावगे येथील तलावात एक तरुण मासे पकडत होता. यावेळी दुसर्‍या तरुणाने तेथे येऊन या माशांना मी खायला देतो, तू पण खायला दे आणि मग पकड, अशी विचारणा केली. यातून दोघांमध्ये वादावादी होऊन एकमेकांना मारहाण केली.

यामध्ये जखमी झालेल्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोघा तरुणांपैकी एकजण नाईक समाजाचा तर दुसरा हणबर समाजाचा आहे. त्यांचा हा वाद वैयक्तिक स्वरूपाचा असताना गावातील काही समाजकंटकांनी याला भाषावादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. परंतु, असे काहीही नसून तो व्यक्तिगत वाद असल्याचे डीसीपी गडादी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button