‘एक का डबल’….! 35 लाखात मिळाल्या ‘भारतीय बच्चोंका बँकेच्या’ नोटा!

‘एक का डबल’….! 35 लाखात मिळाल्या ‘भारतीय बच्चोंका बँकेच्या’ नोटा!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोह, प्रलोभन व्यक्तीला कोणत्या वळणावर घेऊन जाईल याचा काही नेम नाही. पुण्यातील एका डांबर व्यवसायिकाला एक का डबल करणे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 35 लाख रुपयांना पडले आहे. पुणे व्हाया गुजरात भुज असा दौरा करून आल्यानंतर त्यांना 35 लाख रुपयांच्या बदल्यात 'भारतीय बच्चोंका बँक' असे लिहलेल्या नोटांची बॅग घेऊन बसण्याची वेळी आली आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सादिक मुबारक शेख (वय.56,रा. मुंढवा), जसविंदर उर्फ जस्सी तारासिंग गुणदेव (वय.55,रा. रविवार पेठ) या दोघांना अटक केली. तर जितेंद्र मेहता (रा. भरूच गुजरात) याच्या विरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबात असीफ नसीर खान (वय.52,रा.क्लोरअर टर्म सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 22 मे ते 28 जून 2022 या कालावधीत घडली आहे.

फिर्यादी खान यांचा डांबर आणि ट्रेडींगचा व्यवसाया आहे. खान यांचा एका मित्रामार्फत आरोपी शेख याच्या सोबत त्यांच्या मुंढवा येथील ऑफिसमध्ये परिचय झाला होता. त्यावेळी शेख याने त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या नवीन एका सिरीजच्या नोटा आहेत. गुंतणूक केल्यास तुम्हाला एका नोटेच्या बदल्यात दोन नोटा मिळतील, असे प्रलोभन दाखवले. दहा लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला वीस लाख रुपये फायदा होईल असे सांगितले. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून खान गुंतवणूक करण्यास तयार झाले.

लालच वाढली आणि भूज गाठले!

26 मे रोजी शेख हा जसवंदरसिंग याला खान यांच्या ऑफिसमध्ये घेऊन आला. जसविंदर याने जितेंद्र मेहता याचे नाव सांगून गुजारात येथून तो आपल्याला एकच्या बदल्यात दुप्पट देणास असल्याची थाप मारली. ठरल्याप्रमाणे खान यांनी बँकेतून पैसे काढून 20 लाख रुपये शेख आणि जविंदर या दोघांच्या हवाली केले. दुसर्‍या दिवशी डबल नोटा देण्याचे ठरले होते. खान यांनी दोघांना फोन केला, तेव्हा त्यांना आपल्याला गुजरात भुज येथे जावे लागणार आहे. तुम्ही आणखी जास्त गुंतवणूक केली तर मोठा फायदा होईल असे सांगण्यात आले. खान या दोघांच्या जाळ्यात पुरते अडकले होते. त्यांनी गुजरात येथे जाताना बरोबर पंधरा लाख रुपये घेतले. तेथे गेल्यानंतर ते पैसे जितेंद्र मेहता नावाच्या माणसाने पाठवलेल्या व्यक्तीला दिले. त्याने मेहता याचे नाव सांगून नवीन नोटांची बॅग दाखवली. शेख यांना पैसे मिळण्याची मोठी आशा वाटली होती. आरोपींनी पैसे तुमच्या ऑफिसला पोहचतील असे सांगितले.

8 जून रोजी जसवींदर हा एक बॅग खान यांच्या ऑफिसमध्ये ठेवून गेला. त्यांनी बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यामध्ये भारतीय बच्चोंका बँक असे लिहलेल्या खेळण्यातील नोटा मिळून आल्या. खान यांनी आरोपींना फोन करून विचारले असता, चुकून बॅग आल्याचे सांगितले. त्याचवेळी आरोपींनी खान याना आणखी पंधरा लाखाची मागणी करून एक कोटी देण्याचे प्रलोभन दाखवले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पूर्वी दिलेल्या पैशाची मागणी केली.

अशा ठोकल्या ठगांना बेड्या

गस्तीवर असताना कर्मचारी शंकर नेवसे यांना लष्कर परिसरातील कुमार पॅव्हेलियन येथे दोन व्यक्ती 500 रुपयांच्या डबल सिरीजच्या नोटांचा व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक विशाल मोहिते,उपनिरीक्षक नितीन कांबळे कर्मचारी प्रमोद कोकणे, विनोद चव्हाण, निखील जाधव, नागनाथ राख यांच्या पथकाने सापळा रचून दोघा संशियांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशी दोघांनी व्यावसायिकाला डबल नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे सांगितेल. तसेच एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले होते.

२०२० साली असेच प्रकरण झाले होते उघड

जून 2020 मध्ये गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक आणि लष्कराने संयुक्त कारवाई करत विमानतळ परिसरातून एक खोली भरेल एवढा खेळण्यातील नोटांचा साठा जप्त केला होता. बॉम्पे सॅपर्सच्या एका कर्मचार्‍यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. ठगवणूक करण्यासाठी अशा नोटांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. एखादा व्यक्ती प्रलोभनाला बळी पडल्यानंतर त्याला सुरूवातीला अशा नोटांवर खर्‍या नोटा ठेवून बॅग दाखवली जाते. मात्र जेव्हा बॅग हाती पडते तेव्हा त्या खेळण्यातील नोटा असतात. अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पाचशेच्या एका नोटेच्या बदल्यात दोन नोटा देतो असे सांगून जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाशी संपर्क साधावा.

                                            – क्रांतीकुमार पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news