रंगला मुलांचा कौतुक सोहळा; बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम | पुढारी

रंगला मुलांचा कौतुक सोहळा; बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘कलाकारांच्या मागे अनेक समस्या असतात. गैरसोय असते, सारखे दौरे असतात. मात्र, त्यातही वेळात वेळ काढून आपण कलाकार मंडळी मुलांना वेळ देता. त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देता, ही गोष्ट कौतुकास्पद आहे,’ अशा शब्दांत अभिनेते माधव अभ्यंकर यांनी कलाकारांचे व त्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बालगंधर्व रंगमंदिर महोत्सवात माधव अभ्यंकर आणि अर्जुन जाधव यांच्या हस्ते बालगंधर्व परिवारातील कलाकारांच्या पाल्यांचा दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या वेळी बालगंधर्व परिवाराचे मेघराज राजेभोसले, वैभव जोशी, बाळासाहेब अमराळे, डॉ. गणेश चंदनशिवे आदी उपस्थित होते. या वेळी स्नेहा दुधाळ (उस्मानाबाद) हिचा कुस्ती या खेळातील उत्तम कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर महोत्सवामध्ये पुण्यातील लोककलावंतांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम सादर केला. या वेळी बालगंधर्व परिवारातील लोककलावंतांना ‘बालगंधर्व’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेश्मा/वर्षा परितेकर प्रस्तुत पारंपरिक लावणी नृत्याविष्कारात बैठकीची लावणी आदीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, अभिनेते विजय पटवर्धन आणि सहकार्‍यांनी ‘हास्यनगरी’ हा कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली.

हेही वाचा

योजनांसाठी स्वतंत्र संचालनालय; प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर

33 लाख वीजमीटर लवकरच उपलब्ध; नवीन स्मार्ट मीटर खरेदीच्या निविदाप्रक्रिया प्रगतिपथावर

Back to top button