33 लाख वीजमीटर लवकरच उपलब्ध; नवीन स्मार्ट मीटर खरेदीच्या निविदाप्रक्रिया प्रगतिपथावर | पुढारी

33 लाख वीजमीटर लवकरच उपलब्ध; नवीन स्मार्ट मीटर खरेदीच्या निविदाप्रक्रिया प्रगतिपथावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महावितरणकडून सिंगल फेजच्या 12 लाख 80 हजार नवीन स्मार्ट मीटरच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. आगामी वाढत्या वीजजोडणीची मागणी लक्षात घेऊन आणखी 20 लाख सिंगल फेज मीटर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 32 लाख 80 हजार नवीन वीजमीटर लवकरच टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. पुरेसे मीटर उपलब्ध व्हावेत, यासाठी महावितरणकडून येत्या सप्टेंबर 2022 पर्यंत 15 लाख नवीन सिंगल फेज वीजमीटरच्या पुरवठ्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. गेल्या एप्रिलअखेर 1 लाख 31 हजार 802 वीजमीटर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध होते, तर मे महिन्यापासून आतापर्यंत आणखी 2 लाख 50 हजार नवीन मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे.

सोबतच कार्यादेश दिलेल्या 75 हजार नवीन थ्री फेजच्या मीटरचा पुरवठादेखील सुरू झाला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांकडून मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणचे संबंधित कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. याशिवाय येत्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी 3 लाख 25 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत.

सोबतच कार्यादेशाप्रमाणे 75 हजार नवीन थ्री फेजच्या मीटरचा पुरवठा सुरू झाला आहे. नागपूर परिमंडलामध्ये दरमहा सरासरी 6 हजार नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. त्या तुलनेत मे व जूनमध्ये दुपटीहून अधिक 15 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर, या आठवड्यात आणखी 4 हजार वीजमीटरचा पुरवठा होणार आहे. तसेच, एप्रिल व मे महिन्यात 3562 ग्राहकांचे नादुरुस्त मीटर बदलून देण्यात आले आहेत. आकडेवारीमधील थोड्याफार फरकाने हीच स्थिती महावितरणच्या इतर परिमंडलांमध्ये आहे.

 

Back to top button