

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर व जिल्ह्यातील जवळपास एक कोटी नागरिकांची तहान भागविणार्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्याची स्थिती पावसाअभावी दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. खडकवासला धरणातील पाण्याची पातळी खाली गेल्याने धरणतीरावरील रुळे, मांडवी, खानापूर आदी गावांत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
जून महिना संपत आला, तरी तुरळक पावसाचा अपवाद वगळता खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणक्षेत्रांत पावसाची उघडीप सुरू आहे. दुसरीकडे धरणसाखळीतील पाणीसाठ्यात वेगाने घट सुरू असून, सोमवारी (दि. 27) दिवसअखेर धरणसाखळीत 2.72 टीएमसी म्हणजे केवळ 9.34 टक्के इतकेच पाणी शिल्लक होते.
गेल्या वर्षी आजच्या दिवशी 27 जून 2021 रोजी धरणसाखळीत 8.42 टीएमसी म्हणजे 28.90 टक्के पाणी होते. त्या तुलनेत सध्या 30 टक्केही पाणी नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अल्प पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरवली आहे. दोन दिवसांपासून पानशेत-वरसगावच्या डोंगरी पट्ट्यात तुरळक पाऊस पडत आहे. मात्र, जोरदार सरी पडत नाहीत.
खडकवासला धरणातील पाण्याची पातळी खाली गेल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून तीरावरील रुळे गावची पाणीपुरवठा योजना बंद झाली आहे. रुळे गावच्या तिडकेवाडी, मोरदरी, गावठाण आदी वाड्या-वस्त्यांत भीषण पाणीटंचाई सुरू आहे. धरणाच्या पाणलोटातून तसेच मिळेल तेथून पायपीट करीत महिला, ग्रामस्थ पाणी आणत आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने वाड्या-वस्त्यांत आळीपाळीने कसेबसे टँकरने पाणी दिले जात आहे.