नगरसेवक ओसवाल यांच्यासह चौघांवर गुन्हा | पुढारी

नगरसेवक ओसवाल यांच्यासह चौघांवर गुन्हा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: गंगाधाम रस्त्यावरील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघांविरोधात कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिलांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकारही या वेळी घडला. शाहजी रणदिवे, सुकेशनी ऊर्फ राणी बनसोडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुषमा सुनील रिठे (वय 32, रा. गंगाधाम रस्ता, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधाम रोडवरील चिंतामणी ट्रान्स्पोर्टशेजारी सर्व्हे नं. 656/09/01/01 येथील जागा फिर्यादी सुषमा रिठे यांचे पती व दीर यांनी खरेदी केली होती. तर ही जमीन सुमित तेलंग याचे वडील दिलीप तेलंग यांच्या मालकीची असल्याचे सांगून संशयित आरोपी जागेवर आपला हक्क सांगत होते. हा वाद सुरू असताना 24 जून रोजी सुषमा रिठे, त्यांची बहीण नीलिमा आणि आई मुक्ता सखाराम कांबळे असे सर्व जागेवर गेले असताना तेलंग, रणदिवे आणि बनसोडे यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर तेलंग याने सुषमा रिठे यांना मारहाण केली. त्यावेळी ओसवाल यांनी त्यांना, ‘तुमचा जीव तुम्हाला महत्त्वाचा नाही का? आता तरी जागेचा विषय सोडून टाक, इथून निघून जा’ असे सांगितले. त्यानंतर धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे करत आहेत.

पॉलिशच्या बहाण्याने दागिने पळविले

पिस्तूल बाळगणार्‍या सराइताला अटक

Back to top button