पुणे: पुढारी वृत्तसेवा: 'शिवजींच्या संतूरवादनाला आध्यात्मिक बैठक होती. अशा महान कलाकाराच्या सन्निध्यात 47 वर्षे शिष्य म्हणून राहण्याचा योग आला, हे माझे सात जन्माचे पुण्य समजतो', अशा भावना पं शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सतीश व्यास यांनी व्यक्त केल्या. ऋत्विक फाउंडेशनतर्फे पं. शिवकुमार शर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पंडित व्यास यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी रसिकांशी संवाद साधताना गुरू-शिष्य नात्यातील आठवणींचा पट उलगडला. पंडित व्यास यांच्याशी फाउंडेशनचे संचालक सुदीप्तो मर्जित यांनी संवाद साधला.
शिवजींच्या व्यक्तिचित्रणाविषयी विचारले असता पंडित व्यास म्हणाले, 'शिवजी गंभीर प्रकृतीचे होते, सहसा कोणात मिसळत नसत, पण पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकिर हुसेन अशा कलाकारांच्या सहवासात गप्पांवेळी ते खुलत असत. त्या वेळी त्यांच्या उत्तम विनोदबुद्धीचे दर्शन होई. सुरुवातीच्या काळात शिवजींच्या संतूरवादनाकडे रसिक आकृष्ट होत नव्हते. त्यावेळी मूळ संतूर वाद्यातील रचनेत बदल करत संतूरवादनाची स्वत:ची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली शिवजींनी निर्माण केली. यानंतर शिवजींचे वादन रसिकमान्य होत गेले. देशातच नव्हे तर विदेशातही त्यांच्या वादनाचे चाहते निर्माण झाले.' फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती संस्थापक प्रवीण कडले यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता पुरंदरे यांनी केले.
हेही वाचा