नगर : पुणतांबे येथे आता विधवा प्रथा बंद | पुढारी

नगर : पुणतांबे येथे आता विधवा प्रथा बंद

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पुणतांबा ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत घेतला. दरम्यान, या ठरावाबाबत अंमलबजावणीसाठी जनजागृती करावी, असा यावेळी एकमुखी सूर उमटला. सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत जनहित ग्रामीण संस्थेचे सचिव संजय जोगदंड यांनी याबाबतचा ठराव मांडला.

पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायांच्या बोटांमधील जोडवी काढणे, यासारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. विधवा महिलांना कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभाग दिला जात नसे. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारावर गदा आल्याने ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा व यावर प्रबोधन करावे, असा ठराव जोगदंड यांनी मांडला.

विधवा प्रथा बंद होणे ही खरोखरच काळाची गरज आहे. यासाठी गावात प्रबोधन व जनजागृती करावी. विधवांना सन्मानाने वागणूक मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी मागणी सुहास वहाडणे यांनी केली. विकास आघाडीचे नेते धनंजय जाधव, सुभाष कुलकर्णी आदींनी या ठरावास पाठिंबा देऊन, ही प्रथा बंद होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.

जनजागृती करणार : डॉ. धनवटे
विधवांबद्दलच्या प्रथा जुन्या व कालबाह्य झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विधवांना असमान वागणूक देणे चुकीचे आहे. पुरुषांना कोणतेही नियम नाहीत. महिलांना मात्र रूढी, परंपरांचे नियम का? सौभाग्याचे लेणे अबाधित राखण्यासाठी अधिकार दिले पाहिजे. गावासह परिसरात प्रथा बंदीसाठी जनजागृती करणार असल्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे म्हणाले.

Back to top button