

पाटस : पुढारी वृत्तसेवा
दौंड तालुक्यात दोन दिवस मुक्कामी असणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. २६) वरवंड (ता. दौंड) मुक्कामी असताना सोमवारी (दि. २७) पहाटे ६ वाजताची आरती घेऊन तालुकावासियांना निरोप देण्यासाठी बारामती तालुक्यात उंडवडी गवळ्याची या ठिकाणी पुढील मुक्कामासाठी निघाला. हा सोहळा पाटस दिशेने रवाना झाला असताना ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता आगमन झाले असून दुपारपर्यंत विसावा घेणार आहे. मंदिरातून सकाळी ११ वाजता रोटी घाट पार करण्यासाठी व पुढील प्रवासासाठी पालखी बाहेर पडणार आहे.
वरवंड (ता. दौंड) येथील विठ्ठल मंदिरातून पुढील मुक्कामासाठी पालखी सोहळ्याने प्रवास केला असता पहिली विश्रांती पावणे आठ वाजता पाटस हद्दितील भगवतवाडी येथे केला. ९ वाजता पालखीचे आगमन गावात होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतीषबाजी करत स्वागत केले आहे. वरवंड येथून चार किमी अंतरावर असणाऱ्या पाटस हद्दीतील भागवतवाडी येथे पालखीचे सकाळी पावणेआठ वाजता आगमन झाल्यावर वैष्णवांना चहा नाष्टाची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी १५ मिनिटे विश्रांती घेतल्यावर दुपारचा विसावा घेण्यासाठी पाटस येथील चौकात पालखी येताच पालखीचे जंगी स्वागत झाल.
यावेळी गावच्या सरपंच अवंतिका शितोळे, उपसरंचप छगन म्हस्के, सत्वशील शितोळे, योगेंद्र शितोळे, प्रशांततात्या शितोळे, तानाजी केकाण, डॉ. मधुकर आव्हाड, नितीन शितोळे, प्रमोद भागवत, नागेश्वर देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप भागवत, पाटसचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस घनशाम चव्हाण, पोलीस संदीप कदम, साहेबराव वाबळे, अशोक पानसरे, आण्णा तांबे, संभाजी देशमुख, प्रकाश भोंडवे, स्वप्नील भागवत, शिवाजीबापू ढमाले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीने प्रवेश केल्यावर भाविकांना दर्शन खुले केले. पुढील प्रवासासाठी दरवर्षी अवघड ठरणारा रोटी घाट पार करण्यासाठी सर्व वैष्णवांना पाटस गावाकडून गोड जेवणाचा स्वाद देण्यात आला आहे.
ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरातून सकाळी ११ वाजता रोटी घाट पार करण्यासाठी व पुढील प्रवासासाठी बाहेर पडणार आहे. ऐतिहसिक महत्व असलेला रोटी घाट जरी पालखी मार्गाच्या चौपदरी कामात नाहीसा झाला असला तरी नव्याने तयार झालेले रोटी घाट मात्र पालखी सोहळ्याला पहिल्यांदाच कसा पार करेल व किती बैल जोड्यांची मदत घ्यावी लागेल हे दृश्य पाहण्यासाठी तालुका व तालुका बाहेरील नागरिक मोठ्या संख्येने रोटी घाट येथे आले आहेत. पुढे रोटी घाट पार करून हा पालखी सोहळा रोटी येथे अभंग आरती करत हिंगणीगाडा मार्गे वासुंदे येथून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे रात्री ८ वाजताच्या दरम्यान मुक्कामासाठी पोहचणार आहे. पालखीचा हा सर्वात मोठा टप्पा आहे.
हेही वाचा