पालखी सोहळ्यादरम्यान मास्क वापरा; आरोग्य अधिकारी यांचे आवाहन | पुढारी

पालखी सोहळ्यादरम्यान मास्क वापरा; आरोग्य अधिकारी यांचे आवाहन

बारामती : पुढारी वृत्तसेवा: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यात दि. 27 जून रोजी, तर बारामती शहरात दि. 28 जून रोजी आगमन होणार आहे. यंदा पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग आहे. कोरोनाचे संकट कमी झालेले असले तरी ते पूर्णतः नष्ट झालेले नाही. त्यामुळे पालखी सोहळ्यात गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.  दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा उत्साहाने होत असल्याने वारकर्‍यांची संख्या लक्षणीय आहे.

या पार्श्वभूमीवर पुन्हा कोविडच्या रुग्णांची संख्या वाढू नये या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळेच पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍या प्रत्येकाने मास्क व्यवस्थित लावूनच सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात काही दवाखान्यांत थंडी तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनीही अशा रुग्णांवर केवळ औषधोपचार न करता त्यांची कोविडची तपासणी करावी, असेही निर्देश दिल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय व रुई ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी सुरू आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रॅपिड अँटिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा. तसेच ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे अशांनी तिसरा बूस्टर डोस घ्यावा. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा, लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून सर्वांनी सहकार्य करण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा

पिंपरी : गांजा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा

मूत्रपिंड, सांध्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष नको; पावसाळ्यात अधिक काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

83 व्या वर्षी पत्नीकडून पोटगी

Back to top button