भांडण करणार्‍यास जाब विचारणे भोवले; मंचर येथे एकाचा लाकडी दांडक्याने मारून खून | पुढारी

भांडण करणार्‍यास जाब विचारणे भोवले; मंचर येथे एकाचा लाकडी दांडक्याने मारून खून

मंचर : पुढारी वृत्तसेवा: वारंवार भांडण करणार्‍यास जाब विचारण्यासाठी गेलेल्या अर्जुन कुशाबा घोलप (वय 29, मूळ रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर) यांचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री नऊ वाजेच्या सुमारास मंचर येथे घडली. याप्रकरणी तुकाराम बबन शिरसाठ (रा. टेंभुर्णी, ता. शिरूर कासार, जि. बीड) याच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संजय गणपत तारू (वय 51, रा. वडगाव काशिंबेग, ता. आंबेगाव) यांनी दिली आहे.

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय तारू हे महात्मा गांधी विद्यालय मंचर येथे शिपाई आहेत. विद्यालयाच्या शेजारीच असलेल्या खोल्यांमध्ये अर्जुन कुशाबा घोलप हा मोलमजुरी करून एकटा राहात होता. त्याचे बाजूचे खोलीत गंगुबाई शिवाजी जवरे, शिवाजी जवरे व त्यांचा मुलगा ओंकार जवरे हे राहात होते.

शाळेच्या पाठीमागील झोपडीत तुकाराम बबन शिरसाठ, बाळासाहेब बबन शिरसाठ, बबन शिरसाठ, सरला बबन शिरसाठ (मूळ रा. टेभुर्णी, ता. शिरूर कासार, जि. बीड), कावेरी आजिनाथ भाबड (रा. आगसखांड, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे राहतात. हे सर्व जण महात्मा गांधी विद्यालयाच्या शेजारी वास्तव्यास असल्याने फिर्यादी संजय तारू व त्यांची चांगली ओळख झाली आहे.

गुरुवारी फिर्यादी संजय तारू हे नाईट ड्युटीसाठी विद्यालयात आले असता शाळेच्या जवळ असलेल्या खोल्यामध्ये भांडणे चालू होती. गंगूबाई हिने मटण बनवले होते व तुकाराम शिरसाठ याला जेवायला बोलावले नसल्याच्या कारणावरून त्या दोघांमध्ये भांडणे झाली. यामध्ये तुकाराम याने गंगूबाई जवरे यांचा मुलगा ओंकार जवरे (वय 13) याला कौल फेकून मारल्याने त्यास डोक्यामध्ये जखम झाल्याने गंगूबाई व ओंकार जवरे हे दोघे दवाखान्यात निघून गेले.

त्यानंतर अर्जुन घोलप हा तुकाराम शिरसाठ याला म्हणाला की, तुझे नेहमीच भांडणे का होत असतात? यामुळे चिडून जाऊन तुकाराम शिरसाठ याने हातातील लाकडी दांडक्याने अर्जुन घोलप याला मारहाण केली. दरम्यान, तुकारामच्याच बहिणीने शेजारील हॉटेलमधून फोन करून रुग्णवाहिका बोलावली,

परंतु अर्जुन घोलप याला मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होतो. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, आरोपी तुकाराम शिरसाठ याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर करीत आहेत.

हेही वाचा

एकनाथ शिंदे म्‍हणाले, अद्याप गटाचे नाव ठरले नाही, आम्‍ही शिवसेनेतच आहोत..

धक्कादायक! पतीनं हात बांधून चौथ्या मजल्यावरून फेकून दिलं, महिला ब्लॉगरचा मृत्यू

पाथर्डी : घोषणांनी पालिका कार्यालय दणाणले ! पाण्यासाठी पाथर्डी पालिकेवर हंडामोर्चा

Back to top button