सत्ताबदलाने भीमा-पाटसचे धुराडे पेटणार; दौंडमधील ऊस उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येण्याची चर्चा | पुढारी

सत्ताबदलाने भीमा-पाटसचे धुराडे पेटणार; दौंडमधील ऊस उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येण्याची चर्चा

जयवंत गिरमकर

देऊळगाव राजे : राज्यात सत्ताबदलाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. त्यातच सत्ता बदलातून कोणाच्या पदरी काय पडणार, कोणाचे काय जाणार याच्या चर्चाही चौकाचौकात व सोशल मीडियात जोरदार वाहू लागल्या आहेत. राज्यात सत्ताबदल झाला तर दौंड तालुक्यातील भीमा-पाटसचे धुराडे पुन्हा पेटेल व तालुक्यातील ऊस उत्पादकांना अच्छे दिन येतील अशीही चर्चा रंगू लागली आहे.
दौंड तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखाना हा एकमेव सहकारी साखर कारखाना काही वर्षांपासून कामगार व बँकांची देणी देऊ न शकल्याने बंद आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडे स्व. आमदार सुभाष कुल यांच्या निधनानंतर कारखान्याची एकहाती सत्ता राहिलेली आहे.

परंतु त्यांच्या कार्यकाळात कारखान्याची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली व भीमा-पाटस कारखान्याचे धुराडेही मागील काही वर्षांपासून पेटले नाही. कारखान्याच्या या परिस्थितीस आजी की माजी संचालक मंडळ जबाबदार याविषयी तालुक्यातील जनता मात्र अनभिज्ञ आहे. परंतु भीमा-पाटस कारखाना सुरू न राहिल्याची सल आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या मनात कायमच राहिलेली दिसते. कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी तत्कालीन मुखमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळिकीचा फायदा घेऊन मोठे आर्थिक पॅकेज घेऊन कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

एकनाथ शिंदेंकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

परंतु पुरेसा ऊस उपलब्ध न झाल्याने कारखान्याचा गाळप हंगाम आटोपता घ्यावा लागला. त्यानंतर मागील काही वर्षात कारखान्याचे धुराडे पेटलेच नाही. यातील अनेक कारणांबरोबरच राज्यातील सत्ताबदल व आमदार राहुल कुल यांचा भाजप प्रवेश हे देखील एक कारण आहे. भीमा-पाटस सुरू करण्यासाठी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष यांनी मध्यंतरीच्या काळात अनेक प्रयत्नही केल्याची चर्चा आहे. परंतु सत्ताधार्‍यांचे दौंडच्या ऊस कारखानदारीत असलेले हितसंबंध पाहता राहुल कुल यांच्या पदरी निराशाच पडल्याची चर्चा आहे.
मध्यंतरीच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठीही आमदार कुल यांच्याकडून प्रयत्न झाले.

त्यास मात्र विविध कारणांनी खो बसल्याची चर्चा आहे. भीमा-पाटस बंद असल्याची सल आमदार कुल यांच्या मनात आहेच. परंतु त्याचा त्यांच्या राजकीय करकिर्दीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी राहुल कुल हे पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. राज्यात जर सत्ताबदल झाला तर देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुकमध्ये असल्याचा फायदा राहुल कुल यांना अनेक मार्गांनी होणार आहे. त्यातच एक म्हणजे आगामी गाळप हंगामात भीमा-पाटसचे धुराडे पुन्हा पेटेल, अशी आशा कारखाना सभासद व ऊस त्पादकांना आहे.

हेही वाचा

शिरूरच्या बेट भागात समाधानकारक पाऊस; पेरणीच्या कामाला येणार वेग

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : सोनिया गांधींची चौकशी आता पुढील महिन्यात

नगर : घारगाव परिसरात मुसळधार पाऊस

Back to top button