अभियंत्याला 48 लाखांचा गंडा; अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे सांगत परताव्याच्या आमिषाने फसवणूक | पुढारी

अभियंत्याला 48 लाखांचा गंडा; अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे सांगत परताव्याच्या आमिषाने फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आएएस, आयपीएस आणि राजकीय लोकांसोबत आपली मोठी ओळख असल्याचे सांगून आर्थिक गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत एका आयटी अभियंत्याला तब्बल 47 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी दीपक रमेश शिंदे (वय 27, रा. डी 301, रोहन फेज-1, बाणेर; मूळ रा. बेलपिंपळगाव, नेवासा) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाणेर येथील 35 वर्षीय अभियंत्याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 डिसेंबर 2021 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे हा लोकसेवा व राज्यसेवेची तयारी करीत होता. त्याला त्यात काही यश आले नाही. एका मित्राच्या माध्यमातून फिर्यादी अभियंत्याचा शिंदेसोबत परिचय झाला होता. त्या वेळी त्याने अभियंत्याला तो सीए, फायनान्सर, शेअर मार्केट, स्वामी समर्थ पंडित, हात पाहतो, लोकांच्या घरी जाऊन पूजा अर्जा करतो, तसेच तो स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करतो, असे सांगितले. शिंदे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना त्याचा अनेकांसोबत परिचय होता.

त्यातील काही जण पोलिस व महसूल खात्यात अधिकारी असल्याचे तो सांगतो. त्यांच्यासोबत आपला जवळचा परिचय असून, त्यांचे पैसे त्याच्याकडेच गुंतवणुकीला असल्याचे देखील तो सर्वांना सांगत असे; तसेच त्याची बहीण अहमदाबाद येथे जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करून त्याने फिर्यादींना जाळ्यात खेचले. त्यानंतर शिंदेने फिर्यादींना सांगितले की, आपण सरकारची जमीन विकत घेणार आहोत. त्यात गुंतवणूक करू तसेच माझ्याकडे मोठ-मोठे फायनान्सर आहेत. ते अल्पकालावधीची गुंतवणूक करतात. त्या बदल्यात मी तुला दहा, पंधरा ते वीस टक्के व्याज देईन, असे सांगून वेळोवेळी फिर्यादी अभियंत्याकडून 47 लाख 80 हजार रुपये घेतले.

परभणी : मुलींच्या वसतिगृहांसाठी एक कोटी; उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन

अभियंत्याच्या पत्नीकडून देखील त्याने पैसे घेतले आहेत. अभियंत्याला गुंतवणूक केल्यानंतर काही कालावधीत शिंदेबाबत संशय येऊ लागला होता. मात्र, त्याने बोलण्याच्या नादात अभियंत्याला गुंतवून ठेवले. खूप कालावधी लोटल्यानंतर अभियंत्याने शिंदेमागे पैसे मागण्याचा तगादा लावला. त्या वेळी त्याने अभियंत्याला पैसे पाठविले आहेत, ज्याच्याकडे दिले तो पळून गेला आहे, दोन दिवसांत मिळतील, फायनान्सरकडे आलो आहे, अशी विविध कारणे सांगून वेळ मारून नेली.

पत्नीची आई आजारी पडल्यानंतर अभियंत्याने शिंदेकडे सहा लाखांची मागणी केली. त्या वेळी त्याने सहा लाख रुपये पाठविल्याचा मेसेज पाठविला. मात्र, बँकेत चौकशी केली असता तो बनावट असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने याबाबत चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शिंदेने अनेकांना असा गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्यादृष्टीने त्यांनी तपास सुरू केला आहे.

धमकीचे पत्र अन् ईडीच्या जप्तीचा बनाव
अभियंता जेव्हा शिंदे याच्याकडे पैसे मागत होता, त्याच कालावधीत त्यांच्या घरी एक निनावी पत्र आले. त्यामध्ये ‘तुझ्यामुळे माझे सत्तर लाख रुपयांचे नुकसान झालेे आहे तसेच तू जेव्हा सिंगापूर येथे होता तेव्हा आमचा एक माणूस विमानतळावर पकडला गेला. त्याला दोन वर्षांसाठी जेल झाली. आम्ही तुझ्या घरावर नजर ठेवून आहोत. तुला आणि तुझ्या परिवाराला जिवंत राहायचे असेल, तर मी सांगतो तसे कर. तू जर पोलिसांकडे गेला, तर त्याचे परिणाम वाईट होतील,’ असे लिहिले होते. हा प्रकार घडल्यानंतर शिंदेला अभियंत्याने फोन केला. त्या वेळी ‘मी सर्व पाहून घेतो. माझे सर्वांशी बोलणे झाले आहे. दुसरे लेटर आले तर पाहू,’ असे सांगून त्याने वेळ मारून नेली.

अभियंत्याने पैशाची मागणी केली असता शिंदेने पैसे असलेल्या बॅगेचे फोटो दाखवून येरवडा परिसरात त्यांना पैसे घेऊन जाण्यासाठी बोलावले. ते तेथे गेले असता, शिंदेचा फोन बंद लागला. त्यामुळे ते घरी परतले. तेव्हा त्यांना नामदेव जाधव नावाच्या व्यक्तीने फोेन करून ‘शिंदेला पोलिसांनी पकडले आहे, त्यामुळे त्याला फोन करू नका,’ असे सांगितले. त्यानंतर शिंदेने फिर्यादीला फोन करून सांंगितले की, ‘मला ईडीने पकडले असून, माझी सर्व प्रॉपर्टी जप्त केली आहे.’ त्या वेळी फिर्यादींना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

हेही वाचा

गोवा : ‘एसआयटी’कडून पणजीत आणखी एकाला अटक

गोवा : ‘एसआयटी’कडून पणजीत आणखी एकाला अटक

पालखी सोहळ्यात चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेरा वापरास बंदी

Back to top button