हॉटेलमालक, बाउन्सरची केकवरून तरुणाला मारहाण; ऑनलाइन डिलिव्हरीने झाला गोंधळ | पुढारी

हॉटेलमालक, बाउन्सरची केकवरून तरुणाला मारहाण; ऑनलाइन डिलिव्हरीने झाला गोंधळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा: हॉटेलमध्ये ऑनलाइन मागविलेला केक नेमका कोणाचा, यावरून दोन गटांत वाद होऊन एका गटातील तरुणाला हॉटेलमालक व बाउन्सरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. बाणेर रोडवरील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन ग्रुप आले होते. त्या दोघांनीही ऑनलाइन केक मागविला होता. पण, ऑनलाइन डिलिव्हरी देणार्‍या कंपनीने एकच केक पाठविला. तो केक नेमका कोणाचा, यावरून त्यांच्यात वाद झाला.

त्या वेळी एका ग्रुपमधील तरुणीचे ऐकून हॉटेलमालक व बाउन्सरने तरुणाला मारहाण करून बाहेर काढले. त्यात त्याचा मित्र जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी सूस गावात राहणार्‍या एका 27 वर्षांच्या तरुणाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ठिकाणा हॉटेलचा मालक व बाउन्सरवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर रोडवरील महाबळेश्वर चौक येथील ठिकाणी असलेल्या बारमध्ये रविवारी मध्यरात्री घडला.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वाढदिवस होता. त्यांचे मित्र, चुलत भाऊ व मैत्रीण असे मिळून वाढदिवस साजरा करण्यासाठी ठिकाणा बार येथे गेले होते. मध्यरात्री बारा वाजता फिर्यादी यांच्या मित्राने मागविलेला केक आणला. त्याच्या शेजारीच आणखी एक ग्रुप वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. त्यांनीही ऑनलाइन केक मागविला होता. मात्र, ऑनलाइन डिलिव्हरी देणार्‍या कंपनीने एकच केक पाठविला होता. तेव्हा शेजारी बसलेल्या तरुणीने त्यांच्या टेबलवर येऊन तिने तो केक तिच्या बॉयफ्रेंडसाठी मागविल्याचे सांगून फिर्यादी यांच्याशी वाद घातला.

फिर्यादी हे तिला समजावून सांगत असताना हॉटेलचे बाउन्सर आणि हॉटेलमालक तेथे आले. तेव्हा या तरुणीने हा तरुण आपल्याला त्रास देत असल्याचे बाउन्सरला सांगितले. त्यांनी फिर्यादी यांच्या शर्टला धरून त्यांना बाहेर काढले. फिर्यादीच्या मित्रास ढकलून दिले. त्यांच्या डोक्यास लागून ते जखमी झाले. फिर्यादीच्या चुलत भावाला ओढत बाहेर आणले. त्यात त्यांच्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले. या मित्रावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

हेही वाचा

विद्यार्थ्यांचा ‘वैद्यकीय’कडे कल; पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती

वारीमध्ये बोगस डॉक्टरांना चाप

जिल्हा स्तरावर रिट न्यायालये स्थापन करण्याची मागणी

Back to top button