सिंहगड, राजगडावर पर्यटकांची उच्चांकी गर्दी

सिंहगड, राजगडावर पर्यटकांची उच्चांकी गर्दी

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा; जोरदार पाऊस पडणार्‍या सिंहगड-राजगड भागात मान्सूनचा लंपडाव सुरू आहे. असे असले तरी रविवारी (दि. 19) सुटीच्या दिवशी सिंहगडावर पर्यटकांनी उच्चांकी गर्दी केली होती. दिवसभरात गडावर वाहनाने जाणार्‍या पर्यटकांकडून वन खात्याने तब्बल दोन लाख रुपयांचा टोल वसूल केला. सिंहगडावर दिवसभरात 25 हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली, तर दुर्गम राजगडावर पाच हजारांवर पर्यटकांनी गर्दी केली होती.

राजगड किल्ला तसेच पानशेत, वरसगाव, खडकवासला धरण परिसरही पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाला होता. पुणे-पानशेत रस्त्यावर नांदेड फाट्यापासून खडकवासला, डीआयटी, डोणजे, सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भल्या सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांनी धाव घेतली.

गडाच्या घाटरस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे सकाळी 10 वाजेपासून घाटरस्ता वारंवार बंद करण्यात आला. वाहतूक कोंडी तसेच पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन खात्याच्या सुरक्षारक्षकांना रात्रीपर्यंत धावपळ करावी लागली. सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाबासाहेब जिवडे, नितीन गोळे, रमेश खामकर, राहुल मुजुमले, तानाजी खाटपे, चव्हाण आदी सुरक्षारक्षक वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी घाटरस्त्यापासून गडाच्या वाहनतळापर्यंत धावपळ करीत होते.

वाहनतळावर जागा नसल्याने थेट घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे डोणजे, गोळेवाडी व अवसरवाडी मार्ग टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आला. खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे-पानशेत रस्त्यावरच बेशिस्त पर्यटकांनी दुतर्फा वाहने उभी केली. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हवेली पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले, तरीही सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी सुरू होती.

ई-बस बंद झाल्यापासून गर्दी वाढली

सिंहगडावर रविवारी अडीच हजारांवर दुचाकी, तर एक हजारावर चारचाकी वाहने गेली. शनिवारीही पर्यटकांनी गर्दी केली होती. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली सिंहगडावरील ई-बससेवा बंद करण्यात आल्यापासून पर्यटकांची संख्या चारपटीने वाढली आहे. टोलचे उत्पन्नही वाढले आहे.

राजगड, तोरणावर गर्दी

राजगडावर सकाळपासून जोरदार वारे वाहत होते. अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता. पावसाळी पर्यटनासाठी तरुणांसह महिला, मुले मोठ्या संख्येने आले होते. धोकादायक बुरूज, तटबंदीवर उभे राहून पर्यटक फोटो काढत होते. त्यांना रोखण्यासाठी पुरातत्व खात्याच्या पहारेकर्‍यांना मोठी धावपळ करावी लागली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news