देहूरोड : तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला, पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान | पुढारी

देहूरोड : तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला, पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा: 

आज बरवे झाले ।
माझे माहेर भेटले॥
डोळा देखिले सज्जन,
निवारला भाग सीन ॥

337 व्या आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू येथून पंढरपूरकडे सोमवारी (दि.20) प्रस्थान ठेवणार आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून देहूत दिंड्या दाखल झाल्या आहेत. 329 रजिस्टर दिंड्या व 100 नवीन दिंड्या या सोहळ्यात सहभागी होत आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दिली.

संस्थानने प्रस्थानचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यादृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे. देवळात सुरू असलेला सप्ताह काल्याच्या कीर्तनाने संपणार आहे. त्यानंतर पादुका अहिल्या भजनी मंडपात आणल्या जातील, अशी माहिती संस्थानकडून देण्यात आली. यावेळी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे आणि अजित महाराज मोरे आदी उपस्थित होते.

देहू नगरपंचायतीने घाटाची स्वच्छता, सर्व रस्ते चकाचक केले आहेत. पददिव्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. महावितरणतर्फे 24 तास वीज पुरवठा सुरू ठेवण्यात येण्याचे सांगण्यात आले आहे; तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहा रुग्णवाहिका, 27 डॉक्टर आणि 60 कर्मचारी तैनात राहतील. आरोग्य विभागाने एकूण पाच बाह्यरुग्ण विभाग सुरू केले आहेत.

 

Back to top button