

पौड : पुढारी वृत्तसेवा; माले (ता. मुळशी) येथील पाण्याच्या टाकीसमोर पिकअप व दुचाकीच्या अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 18) रात्री 8 वाजता पुणे-कोलाड महामार्गावर ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ दत्तात्रय भोसले (वय 17) व कुणाल दिलीप भोसले (वय 14, दोघेही रा. बौद्ध वस्ती वळणे, ता. मुळशी) अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.
पिकअप चालक स्वप्नील रमेश पळसकर (वय 29, रा. पळसे, ता. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल स्वप्नील तुकाराम भोसले (वय 24, रा. वळणे, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नील पळसकर हा त्याची पिकअप (एमएच 12 एफडी 3947) घेऊन मुळशीहून पुण्याकडे जात होता.
त्याचवेळी सौरभ भोसले व कुणाल भोसले हे त्यांच्या पल्सर गाडी (एमएच 12 एलवाय 1878) वरून पुण्याकडून मुळशीकडे चालले होते. पिकअपचालक पळसकर यांच्या बेजबाबदार वाहन चालवण्याने या मुलांच्या दुचाकीला धडक बसली व यामध्ये या शाळकरी मुलांचा
मृत्यू झाला.
हेही वाचा