तारळे, एकनाथ माळी : तारळे विभागातील बहुतांश ग्रामपंचायत तसेच सोसायटी निवडणुकीत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गटाचे वर्चस्व आहे. मात्र असे असले तरी अनेकदा जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाने ना. शंभूराज देसाई गटाला धक्का दिला आहे. त्यातच आता जिल्हा परिषद गटाची पुनर्रचना होऊन गावांची अदलाबदल झाली आहे. त्यामुळे ही अदलाबदल कोणाच्या पथ्यावर पडणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तारळे जिल्हा परिषद गट हा तारळे गण व मुरूड गण असा मिळून बनला आहे. तारळे जिल्हा परिषद गटात फेररचनेत काही गावांची अदलाबदल झाली आहे. गतवेळच्या फेररचनेत पाटण जिल्हा परिषद गटातील तीन गावे तारळे जिल्हा परिषद गटात समाविष्ट झाली होती. ती आता पुन्हा कमी झाल्याने 'कहीं खुशी, कहीं गम' अशी राजकीय परिस्थिती झाली आहे. देसाई – पाटणकर या पारंपरिक गटातच ही टस्सल होणार असून, नेते मंडळींनी मतांची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली आहे.
तारळे विभाग देसाई गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण, या निवडणुकीत पाटणकर गटाकडून मात्र देसाई गटाला वेळोवेळी मात देण्यात येते. देसाई – पाटणकर गटाच्या संघर्षात अनेक वेळा भाजपची भूमिका ही देसाई गटाला मारक ठरली आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पाटण नगरपंचायत झाल्याने पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची फेररचना झाली होती. त्यामुळे अस्तित्व संपलेल्या पाटण जिल्हा परिषद गटातील मणदुरे, धडामवाडी व केरळ या मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश तारळे जिल्हा परिषद गटात झाला होता. याचा देसाई गटाला फटका बसला होता. तर पाटणकर गटाला चांगलाच फायदा झाला होता.
पण नवीन फेररचनेत आता ही तिन्ही गावे म्हावशी गटाला जोडली गेली आहेत. ही देसाई गटासाठी जमेची बाजू आहे.
यंदाची निवडणूक दोन्ही गटांना म्हणावी एवढी सोपी राहिलेली नाही.देसाई गटाच्या बालेकिल्ल्याला पाटणकर गटाने वेळोवेळी हादरे दिले आहेत. भाजपची रसद ही पाटणकर गटाला पूरक ठरली आहे. दरम्यानच्या काळात राजकीय पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. पाटणकर गटाला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाटणकर गटापुढे अनेक आव्हाने उभी आहेत.
मागील महिन्यात तारळे विभागातील अनेक गावात सोसायटी निवडणुका झाल्या. यामध्ये अपेक्षेप्रमाणे देसाई गटाने बाजी मारली. मात्र असे असले मागील जिल्हा परिषद निवडणुकीतील कटू अनुभव लक्षात घेत गाफील न राहता देसाई गटाकडून व्यूहरचना आखली जात आहे. दोन्ही गटाच्या इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. अनेकांना जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्वप्ने पडू लागली आहेत. पण आरक्षण जाहीर झाले नसल्याने उघडपणे कोणीही आपले पत्ते खोलत नाही, अशी परिस्थिती आहे.
याशिवाय निवडणूक केव्हा होणार ? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. त्यामुळेच इच्छुकांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे. मात्र, असे असले या निवडणुकीमुळे ना. शंभूराज देसाई गटाची प्रतिष्ठा तर विक्रमसिंह पाटणकर गटाचे अस्तित्व पणास लागणार, हे निश्चित.
काही पदाधिकारी, कार्यकर्ते देसाई गटात…
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गाव तेथे रस्ता, पाणी, वीज यासाठी निधी देत अनेक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पाटणकर गटातील अनेक पदाधिकार्यांनी देसाई गटात प्रवेश केला आहे, ही देसाई गटाची जमेची बाजू आहे. तर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावली आहेत.