सातारा : रयत साखर कारखान्यासाठी आजपासून धूमशान | पुढारी

सातारा : रयत साखर कारखान्यासाठी आजपासून धूमशान

उंडाळे, पुढारी वृत्तसेवा :  माजी मंत्री स्व. विलासराव पाटील संस्थापक असलेल्या रयत कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. कारखान्यासाठी मतदान 24 जुलैला होणार असून, मतमोजणी 26 जुलैला होणार आहे.

रयत सहकारी साखर कारखान्यासाठी सोमवार, 20 जूनपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 24 जून असून छाननी 27 जूनला होणार आहे. तर 28 जूनपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आवश्यकता वाटल्यास 24 जुलै रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 26 जुलैला होणार आहे. रयत सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आजअखेर बिनविरोध झाली होती.

1996 साली स्थापन झालेल्या रयत कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सन 2000 साली घेण्यात आला होता. त्यामुळे कारखाना सुरू झाल्यानंतर 22 वर्ष व तत्पूर्वीची चार वर्षे अशी 26 वर्ष या कारखान्याची निवडणूक झालेली नाही.
मात्र, माजी मंत्री स्व. विलासराव पाटील यांच्या निधनानंतर विद्यमान चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर व रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंगराव पाटील यांचे पुत्र अ‍ॅड. राजाभाऊ पाटील या दोघांमधील राजकीय वैर विकोपाला गेले आहे. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विजयासाठी अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांचे चुलत बंधू असलेले अ‍ॅड. राजाभाऊ यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यानंतर सद्य:स्थितीत शामराव पाटील पतसंस्थेची निवडणूक सुरू असून या निवडणुकीत अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांचे पॅनेल आणि अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांचे पॅनेल आमनेसामने आहे.

वास्तविक 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना प्रथम थेट विरोध करत अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. मात्र, असे असले तरी जयसिंगराव पाटील यांनी अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या विरोधात प्रचारात उडी घेतली नव्हती. मात्र स्व. विलासराव पाटील यांच्या निधनानंतर प्रथमच शामराव पाटील पतसंस्था निवडणुकीच्या प्रचारात उडी घेत जयसिंगराव पाटील यांनी अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना थेट विरोध केला आहे. त्यामुळेच आता रयत कारखान्यात स्थापनेनंतर तब्बल 26 वर्षांनी निवडणूक होण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. सद्य:स्थितीत शामराव पाटील पतसंस्थेसोबत रयत कारखान्याच्या प्रचारास जयसिंगराव पाटील व राजाभाऊ पाटील यांनी प्रारंभ केल्याचे दिसते. त्यामुळेच आता रयत कारखान्याची निवडणूक होणार असे मानले जात आहे.

उत्पादक गटातून 15, तर अन्य गटातून 6…
रयत कारखाना निवडणुकीत 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी एकूण पाच ऊस उत्पादक गट आहेत. उंडाळे, शेवाळवाडी/ म्हासोली, कुंभारगाव, कोळे, तांबवे असे हे पाच गट आहेत. या प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन निवडून दिले जाणार आहेत. तर बिगर ऊस उत्पादक गट, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त भटक्या जमाती या गटातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून दिला जाणार आहे. याशिवाय महिला राखीव गटातून दोन महिला उमेदवार निवडून दिल्या जाणार आहेत.

Back to top button