ऑनलाईन शॉपिंगच्या स्पर्धेत डिलिव्हरी बॉय राजा | पुढारी

ऑनलाईन शॉपिंगच्या स्पर्धेत डिलिव्हरी बॉय राजा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन शॉपिंगला दिवसेंदिवस पसंती वाढल्याने नवीन कंपन्या बाजारात येत आहेत. त्यामुळे डिलिव्हरी बॉयला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे, परंतु सध्या कंपन्या भरपूर आणि डिलिव्हरी बॉय कमी, अशी परिस्थिती आहे. गेल्या 2 – 3 वर्षात ऑनलाईन शॉपिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने डिलिव्हरी बॉयला महत्व आले आहे.

सातारा : वारकऱ्यांच्या वाहनाला आयशर टेंम्पोची धडक; एका वारकर्‍याचा मृत्‍यू , ३० जखमी

त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून डिलिव्हरी बॉयचे महिन्याचे वेतन दिवसेंदिवस वाढत असून आयटी क्षेत्रातील डेव्हलपर पदाच्या समांतर पगार डिलिव्हरी बॉय घेत आहेत. भविष्यात आणखी ऑनलाईन शॉपिंग कंपन्या येत असल्याने डिलिव्हरी बॉयला मागणी वाढणार आहे.

महत्त्व का?

ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांना ऑर्डर वेळेत मिळणे गरजेचे असते. त्यासाठी डिलिव्हरी बॉय हा महत्वाचा घटक आहे. वस्तूंच्या वितरणाचे नियोजन करण्यापासून ते वितरणापर्यंत सर्व जबाबदारी डिलिव्हरी बॉयवर असते. त्यामुळे चांगल्या कुशल मनुष्यबळाची नेहमीच आवश्यकता असते.

टी शर्ट चेंज कंपनी चेंज

अनेक जण पार्टटाइम म्हणून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात आणि दिवसाला ठराविक पैसे कमावतात. अनेक जण दिवसाला शिफ्टप्रमाणे दोन कंपन्यांचे काम करतात. त्यामुळे त्यांना जास्त पैसे कमावता येतात. ठराविक वेळेत जास्तीत जास्त डिलिव्हरी झाल्यास जास्त पैसे मिळतात.

डिलिव्हरी बॉयची कमतरता

सध्या कपडे, किराणा, औषधे, अन्न पदार्थ सर्वच क्षेत्रात ऑनलाईन सप्लाय सुरू झाला आहे. परंतु ऑर्डरचा पुरवठा करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ कमी झाले आहे. मोठ्या प्रमाणात कंपन्या बाजारतात आल्याने डिलिव्हरी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांची गरज पडत आहे. अनेक कंपन्यांनी जाहीर भरती सुरू केली आहे. एखाद्या कंपनीमध्ये नवीन कर्मचार्‍याला थोडाजरी अनुभव मिळाला की दुसरी कंपनी लगेच आपल्याकडे ओढते.

सध्या ऑनलाईन शॉपिंगच्या कंपन्या नव्याने येत असल्याने डिलिव्हरी बॉयला मागणी आहे. पगार आणि ऑर्डरचे टार्गेट यावर मुलं काम करायचे की नाही हे ठरवतात.
– विष्णू सकट,
एरिया सुपरवायझर

खाद्य कंपनी ऑनलाईन ऑर्डरमुळे ग्राहक घरात बसून सर्व काही मागवू लागले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या ऑनलाईनमध्ये गुंतवणूक करत आहेत. मनुष्यबळाची गरज देखील भासणार आहे.
-विक्रम झोपाळे, कपडे विभाग

Back to top button