अकरावीचे सुधारित वेळापत्रक लवकरच; यंदा अपेक्षित नोंदणी नाहीच | पुढारी

अकरावीचे सुधारित वेळापत्रक लवकरच; यंदा अपेक्षित नोंदणी नाहीच

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत सोमवारी (दि. 20) बैठक होणार असून, मंगळवारपर्यंत प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली. यंदा अकरावी प्रवेशासाठी अपेक्षित नोंदणी झाली नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रांत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

तर, उर्वरित जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग-1 भरण्याची प्रक्रिया 30 मेपासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग-2 भरण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू होणार होती. मात्र, प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झालेली नाही. ही नोंदणी सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर साधारणपणे मंगळवारपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवेशासाठी आतापर्यंत केवळ 59 हजार 26 अर्ज भरण्यात आले आहेत. त्यापैकी 35 हजार 307 अर्ज लॉक करण्यात आले आहेत तसेच 19 हजार 972 अर्ज अ‍ॅटो व्हेरिफाइड करण्यात आले आहेत. तर 10 हजार 110 अर्जांची पडताळणी केंद्रावर तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा अकरावी प्रवेशाच्या नोंदणीकडे सध्यातरी विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

दहावीचा निकाल लागेपर्यंत पालक आणि विद्यार्थी अकरावी प्रवेशाबाबत संभ्रमात असतात. आता निकाल लागला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर अर्जाचा भाग-2 भरण्यासाठीचे सुधारित वेळापत्रक सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.

– मीना शेंडकर, सदस्य सचिव, अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती

हेही वाचा

सिंहायन आत्मचरित्र : ‘टोमॅटो एफ.एम.’सह ‘पुढारी’चे उपक्रम

माय मराठीचे काही खरे नाही; राज्यात दहावीच्या निकालात 29 हजार विद्यार्थी मातृभाषेत नापास

‘भेटेन माहेरा आपुलिया’

Back to top button