पिंपरी : व्याजाच्या पैशांसाठी तरुणाचे अपहरण
पिंपरी : व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वादातून तिघांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. मात्र, चिखली पोलिसांनी अवघ्या चार तासांत तिघांना अटक करून तरुणाची सुटका केली. हा प्रकार पूर्णानगर, चिखली येथे गुरुवारी (दि. 16) घडला. याप्रकरणी अपहृत तरुणाच्या वडिलांनी चिखली पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गौतम नवनाथ सोनवणे (रा. संभाजीनगर), मयूर रामपूरे, अब्दुल चौधरी यांना अटक केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 25 वर्षीय मुलाने आरोपी गौतम याच्याकडून व्याजाने 50 हजार रुपये घतले होते. मात्र, त्याने ते परत केले नसल्याचे गौतमचे म्हणणे आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी तरुण आपल्या मावस भावाबरोबर रस्त्याने पायी चालत होता. त्यावेळी आरोपींनी चारचाकी वाहनात येऊन तरुणाला बळजबरीने गाडीतून नेले.
तरुणाचे अपहरण केल्यानंतर गौतमने तरुणाच्या वडीलांना फोन केला. तुम्ही तासाभरात 1 लाख 40 हजार रुपये घेऊन अजंठानगर येथे न आल्यास तुमच्या मुलाचे तुकडे करेल, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणाच्या वडीलांनी चिखली पोलिस धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत लगेचच तपासाची सुत्रे हलविली. संबंधित मोबाईलचे लोकेशन शोधून आरोपींच्या मागावर पोलिसांची दोन पथके पाठवित आरोपींना पकडून तरुणाची सुखरुप सुटका केली.

