Agneepath Scheme : अग्निपथ योजनेत वाढविण्यात आलेली वयोमर्यादा युवकांसाठी लाभदायक | पुढारी

Agneepath Scheme : अग्निपथ योजनेत वाढविण्यात आलेली वयोमर्यादा युवकांसाठी लाभदायक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अग्निपथ योजनेचा (Agneepath Scheme) लाभ घेण्यासाठी 21 ऐवजी 23 वर्षांची करण्यात आलेली वयोमर्यादा युवकांसाठी लाभदायक असल्याचे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रीnitin gadkari यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. लष्करात चार वर्षांकरिता सेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अलिकडेच अग्निपथ योजना सादर केली आहे. तथापि देशभरातून या योजनेला युवकांचा तीव्र विरोध होत आहे. अग्निपथ योजनेत चमकदार कामगिरी करणाऱ्या 25 टक्के युवकांना लष्कराच्या नियमित सेवेत घेतले जाईल तर उर्वरित युवकांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल. याच प्रमुख तरतुदीमुळे युवकांकडून अग्निपथ योजनेला तीव्र विरोध होत आहे.

लष्करात सामील होण्याची वयोमर्यादा 21 वर्षे इतकी आहे. तथापि अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) सुरुवात करताना ही वयोमर्यादा 23 इतकी ठेवण्यात आली आहे. ज्या युवकांचे वय 21 च्या पुढे गेले आहे, त्यांना अग्निपथ योजनेमुळे लष्करात जाण्याची नवी संधी प्राप्त झाली असल्याचे गडकरी यांनी नमूद केले आहे. कोविड संकटानंतर युवकांच्या सक्षमीकरणाला मोदी सरकारने प्राधान्य दिलेले आहे. याच उद्देशाने अग्निपथ योजना आणण्यात आली असल्याचे ते म्हणतात.

महामार्गांचे जाळे दोन लाख किलोमीटरवर नेले जाणार 

दरम्यान वर्ष 2025 पर्यंत राष्ट्रीय महामार्गांचे जाळे दोन लाख किलोमीटवर नेले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी इंडियन रोड्स काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली. देशातील सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याची लांबी 1.47 लाख किलोमीटर इतकी आहे. कल्पना, संशोधनांतील निष्कर्ष आणि नवतंत्रज्ञान याची जपणूक करण्यासाठी इनोव्हेश बँकेची स्थापना केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Back to top button