पुणे: शिक्षिकेला लग्नाच्या जाळ्यात अडकवून केली आठ लाखांची फसवणूक | पुढारी

पुणे: शिक्षिकेला लग्नाच्या जाळ्यात अडकवून केली आठ लाखांची फसवणूक

पुणे: पतीचे निधन झाल्यानंतर दुसर्‍या लग्नासाठी जोडीदार शोधत असणार्‍या शिक्षिकेला एकाने विदेशातून भारतात आल्याची बतावणी करून डॉलर करन्सी बदलण्यासाठी खात्यावर तब्बल 8 लाख 10 हजार भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशील कुमार दुबे (रा. पश्चिम दिल्ली) आणि विजया रिखेश्वर चेतीया (रा. आसाम) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 39 वर्षीय महिलेनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला एका शाळेत शिक्षिकाआहे. तिच्या पतीचे नुकतेच निधन झाल्याने तिच्या घरच्यांकडून दुसरा जोडीदार शोधण्यासाठी सांगितले जात होते. त्याच दृष्टीने फिर्यादी ह्या विवाह संकेत स्थळावर जाऊन जोडीदाराचा शोध घेत होते.

जेवण मागितले म्हणून एसटीच्या वाहक-चालकाला मारहाण; पुणे-नाशिक महामार्गावरील अधिकृत थांब्यावरील प्रकार

शादी डॉट कॉम या वेबसाईटवर त्यांची गॉडवीन नावाच्या व्यक्तीची ओळख झाली. त्याने आपण लंडन येथे राहत असल्याची बतवाणी केली. त्याने महिलेसोबत संभाषण वाढवले. यातून त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू होत असताना त्याने तिला 8 फेब्रुवारी रोजी फोन करून लंडन येथून दिल्ली एअरपोर्ट येथे आल्याचे सांगितले.

तसेच त्याच्याकडे डॉलर्स हे विदेशी चलन असून ते चलन भारतीय चलनात बदलून घेण्यासाठी खात्यावर 8 लाख 10 हजार रूपये पाठविण्यास सांगितले. आरोपीने केलेल्या मागणीवर विश्वास ठेऊन फिर्यादीनेही पैसे पाठवले. यानंतर फिर्यादीला आपली कोणीतरी फसवणूक करत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी हे प्रकरण कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी पाठविले. प्राथमिक तपासात दोन नावे निष्पन्न झाली असून सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे यांनी हा गुन्हा दाखल केला.

Back to top button