भोसरी चौकातील पांढरे पट्टे गायब

पांढरे पट्टे दिसत नसल्यामुळे भोसरी चौकातच थांबलेली वाहने.
पांढरे पट्टे दिसत नसल्यामुळे भोसरी चौकातच थांबलेली वाहने.

भोसरी : परिसरातील प्रमुख चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. परंतु, चौकांमधील पांढरे पट्टे पुसट झाल्यामुळे वाहनचालक व पादचार्‍यांना चौक ओलांडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक चौकातील सिग्नल टायमर यंत्रणादेखील बंद आहे. चौकात पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर बसविण्याची तसेच टायमर सुरळलीत करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांकडून केली जात आहे.

भोसरी परिसरात प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रक दिवे महापालिकेच्यावतीने बसविण्यात आले आहेत. एमायडीसी चौक, लांडेवाडी प्रवेशद्वार, इंद्रायणी कॉर्नर, धावडेवस्ती चौक, दिघीतील मॅगझीन चौक आदी ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला शिस्त लागली आहे. परंतु, येथील चौकात रस्त्यावर पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

तसेच, पादचार्‍यांना चौक ओलांडताना होणारी गैरसोय लक्षात घेता प्रमुख चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगसाठीचे पट्टे मारण्याची मागणी नागरिकातून होत आहे. काही चौकात पांढरे पट्टे स्पष्टपणे दिसत नसल्याने वाहने कुठे थांबवावीत, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. परिसरातील अनेक चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंगसाठी पट्टे, स्टॉपलाइन स्पष्टपणे दिसत नाही.

तसेच, काही ठिकाणीचे टायमर बंद आहेत. त्याचा फायदा घेत काही वाहन चालक या चौकातील सिग्नल तोडताना दिसत आहेत. परिणामी पादचार्‍यांना रस्ता ओलंडताना कसरत करावी लागत आहे. कंपन्या सुटण्याच्यावेळी प्रमुख चौकात वाहनचालकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग व स्टॉप लाइन नसल्याने गैरसोईचे होत आहे.

झेब्रा क्रॉसिंग नाही, मग थांबायचे कुठे?
परिसरातील काही सिग्नल यंत्रणेचे टाइमर बंद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे किती वेळ थांबायचा याचा अंदाज चालकांना बांधता येत नाही. परिणामी ग्रीन सिग्नल मिळताच चालकांची पुढे जाण्याची धांदल उडत असल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news