आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिकांचे वाण विकसित करा; कृषिमंत्री भुसे यांची कृषी विद्यापीठांना सूचना | पुढारी

आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिकांचे वाण विकसित करा; कृषिमंत्री भुसे यांची कृषी विद्यापीठांना सूचना

पुणे: ‘कृषी क्षेत्राचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी विचारात घेऊन कृषी विद्यापीठांनी पिकांचे वाण विकसित करावेत,’ अशी सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली. शेतकर्‍यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे ते म्हणाले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 107 वी बैठक गुरुवारी (दि.16) त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, राज्यपाल नियुक्त सदस्य कृष्णा लव्हेकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. धर्मराज गोखले व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुण्यासाठी आर्थिक आराखडा हवा; मॅकेन्झीचे डॉ. शिरीष संखे यांचा सल्ला

भुसे म्हणाले, ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन संशोधन करून कृषी विद्यापीठाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. ‘विकेल ते पिकेल’ अभियानानुसार बाजाराच्या मागणीप्रमाणे पीक पद्धती विकसित करावी. तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक पीक पद्धती विकसित करण्यासाठी काम करावे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी त्याबाबत संशोधन करून सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावा. आजपर्यंत एकूण 28 वाणांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले असून त्यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भौगोलिक मानांकन मिळालेल्या वाणांचे जतन व संवर्धन करावे.’

या वेळी शिक्षण विभागाचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार शिक्षण संचालक विठ्ठल शिर्के, सहसंचालक सुभाष बोरकर, सहसंचालक अस्मिता बाजी, डॉ. नितीन गोखले यांनी संबंधित विषयाचे सादरीकरण केले.

 

Back to top button