पुण्यासाठी आर्थिक आराखडा हवा; मॅकेन्झीचे डॉ. शिरीष संखे यांचा सल्ला | पुढारी

पुण्यासाठी आर्थिक आराखडा हवा; मॅकेन्झीचे डॉ. शिरीष संखे यांचा सल्ला

पुणे, पुढारी वृत्तसेवा:‘ पुणे महानगराचा खरा विकास करायचा असेल, तर विकास आराखड्याआधी, आर्थिक बृहत आराखडा (इकोनॉमिक मास्टर प्लॅन) तयार करण्याची आवश्यकता आहे,’ असा सल्ला मॅकेन्झी या सल्लागार कंपनीचे भागीदार डॉ. शिरीष संखे यांनी दिला. संपूर्ण महानगराचा शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहतूक आराखडादेखील पुढील चाळीस वर्षांचा विचार करून तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने (एमबीव्हीए) आयोजित ‘सुनियोजित शहरीकरण : निकड व संधी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी एमबीव्हीएचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घाटे, कार्याध्यक्ष अंकुश आसबे, उपाध्यक्ष नितीन देशपांडे, सेक्रेटरी प्रमोद पाटील, खजिनदार रवींद्र पाटे व माजी अध्यक्ष सुधीर दरोडे उपस्थित होते. संखे म्हणाले, ‘सक्षम शहरीकरण हाच रियल इस्टेट क्षेत्राच्या प्रगतीचा महामार्ग आहे.

सुनियोजित शहरीकरणावर चीन सर्वसाधारणपणे 116 डॉलर प्रतिडोई, प्रतिवर्ष भांडवली खर्च करते; तर भारतात ही रक्कम फक्त 17 डॉलर्स एवढीच आहे.’ ते म्हणाले, की पुण्यातील माण-म्हाळुंगे नगररचना योजना पूर्णपणे विकसित झाली, तर जवळपास 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा बांधकाम व्यवसाय निर्माण होऊ शकतो. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मिलिंद देशपांडे यांनी संखे यांची मुलाखत घेतली. श्रीकांत लोहोकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हेही वाचा

शनिवार पेठ, कळस परिसर झाला स्वच्छ !

एकच दिवस बरसला मान्सूनपूर्व पाऊस; हवेचा दाब जास्त, वार्‍याचा वेग कमी

मेंदूवरही होतो जास्त तापमानाचा परिणाम

Back to top button