मेंदूवरही होतो जास्त तापमानाचा परिणाम | पुढारी

मेंदूवरही होतो जास्त तापमानाचा परिणाम

नवी दिल्ली : यावर्षी भारतात वाढलेल्या तापमानाने अनेक विक्रम नोंदविले. मान्सून पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणचा पारा 40 अंशांवर पोहोचला आहे. गेल्या 122 वर्षांच्या इतिहासात यंदाचा मार्च महिना सर्वाधिक उष्ण ठरला. संशोधकांच्या मते, उष्णतेच्या लाटेचा अनेक घटकावर परिणाम होता. या यादीत आता मेंदूचाही समावेश करावा लागेल.

यापूर्वी 2006 मध्ये करण्यात आलेल्या संशोधनातील माहितीनुसार जास्त तापमानाचा कार्यालयात काम करणार्‍यांवरही परिणाम होतो. त्यांची उत्पादक क्षमता प्रभावित होते. ज्यावेळी तापमान 24 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असते, त्यावेळी त्यांची कार्यप्रणाली घटू लागते. याशिवाय जास्त तापमानाचा वयस्क आणि मुलांवरही परिणाम होतो.

2018 मध्ये करण्यात आलेल्या दुसर्‍या एका संशोधनातील निष्कर्षानुसार परीक्षा असते त्यादिवशी जर तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर शैक्षणिक कामगिरीत 14 टक्के घट होऊ शकते. याशिवाय विद्यार्थ्याची उत्तीर्ण होण्याचीही शक्यता 10.9 टक्के कमी हाऊ शकते.

जास्त तापमान हे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर आणि कार्यप्रदर्शनावर कसे परिणाम करते? असा प्रश्न निर्माण होतो. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईसमधील सहायक प्रोफेसर व संशोधक लव वॉर्शने यांच्या मतानुसार जास्त तापमानामुळे मेंदूला होणारा रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो. प्रसंगी माणूस बेशुद्ध होण्याच्या स्थितीतही पोहोचू शकतो.

Back to top button