

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: शहर परिसरात दुचाकी चोरणार्या टोळीतील तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीच्या 17 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. प्रज्वल प्रताप देशमुख (20), अक्षय लहानू जाधव (27), तुषार भारत फटांगरे (21, तिघेही रा. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरटे चाकण चौक येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार, युनिट एकच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी दुचाकीवरून आरोपी संशयीतरित्या खेडकडून येत होते. पोलिसांना पाहून ते पळून जात असताना पोलीस नाईक सचिन मोरे, पोलीस कर्मचारी प्रमोद गर्जे यांनी त्यांचा एक किलोमीटर पाठलाग करून पकडले.
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात असलेली दुचाकी ही त्यांनी म्हाळुंगे, चाकण परिसरातून चोरी केल्याचे उघड झाले. त्यांचा संगमनेर येथील साथीदार तुषार फटांगरे व एक अल्पवयीन साथीदार यांच्यासह आरोपींनी पिंपरी -चिंचवड, पुणे ग्रामीण, नाशिक या परिसरातून दुचाकी चोरी करून त्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, पाथर्डी, अकोले येथे त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री केल्याचे तपासात समोर आले.
सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे, सचिन मोरे, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडीक, सोमनाथ बोर्हाडे, महादेव जावळे, जावेद पठाण, स्विप्निल महाले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अशी करीत होते विक्री
आरोपी चोरलेल्या दुचाकी परिचित लोकांना गाडीची कागदपत्रे नंतर देतो, असे अश्वासन देऊन विकत होते. अशा प्रकारे आरोपींनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना विकलेल्या एकूण नऊ लाख 45 हजार रूपयांच्या 17 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.