गरजू ठरतात किडनीदानाचे शिकार; दिल्लीतील दलालांची टोळी कार्यरत | पुढारी

गरजू ठरतात किडनीदानाचे शिकार; दिल्लीतील दलालांची टोळी कार्यरत

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात किडनी रॅकेटची पाळेमुळे ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्ये केंद्रित असल्याचे उघडकीस आले आहे. गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून किडनी देण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी दलालांची टोळी कार्यरत आहे. किडनी दान हे पुण्याचे काम, अशा जाहिराती करून गरजूंना जाळ्यात ओढले जाते. काही मोठी रुग्णालयेही या बेकायदा प्रकारात असल्याचे उघडकीस आले आहे.

पुण्यातील एका रुग्णालयात काही दिवसांपूर्वी गैरमार्गाने किडनी ट्रान्स्प्लांटचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचे धागेदोरे ठाण्यातील एका प्रतिष्ठित रुग्णालयापर्यंत पोहोचले. दिल्लीतील काही एजंट अशा प्रकारे बेकायदा किडनी ट्रान्स्प्लांटचा धंदा चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या एजंटांनी महाराष्ट्रासह देशभरात दलालांचे जाळे उभारले आहे. त्यांच्याकडून अवयव दानासारखे पुण्याचे काम दुसरे नाही, अशा आशयाची व्हिडीओ अ‍ॅड कॅम्पेन चालवली जाते. हे दलाल कचरावेचक, भिकारी, गरीब मजूर आणि कर्जबाजारी अशा लोकांना हेरतात. त्यांचे मनपरिवर्तन करीत त्यांना किडनी देण्यासाठी मानसिकरीत्या तयार करतात. विशेष म्हणजे, या रॅकेटमध्ये काही रुग्णालयेही मदत करत असल्याचे समोर आले आहे.

या दलालांचे काम फक्त किडनी देणारे सावज शोधण्याचे असते. एकदा का दलालांच्या तावडीत सावज सापडले की, ते संबंधित व्यक्तीचे मनपरिवर्तन करणारे व्हिडीओ, इतर सामग्री, पैसे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किडनी ट्रान्स्प्लांट करणारे हॉस्पिटल मॅनेज करून देण्याचे काम या टोळ्या करतात. साहजिकच, या टोळ्या धनदांडग्यांना किडनी विकून लाखो-कोट्यवधी रुपये कमावतात. त्यात दलाल, रुग्णालयांचा मोठा वाटा असतो.

पुण्यातील प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे, ठाणे आणि कोईम्बतूर येथील रुग्णालयांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील वानवडी येथील इमानदार, ठाण्यातील ज्युपिटर आणि कोईम्बतूर येथील के.एम.सी.एच. ही तीन रुग्णालये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या रुग्णालयांतही बनावट कागदपत्रांद्वारे एजंटांमार्फत किडनी प्रत्यारोपण केल्याचे आढळून आले आहे.

पुण्यातील प्रकरणात दलालांनी किडनी देणार्‍या महिलेस ठरलेले पैसे दिले नाहीत म्हणून तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे किडनी रॅकेट प्रकरण समोर आले. अशाच प्रकारे राज्यात गरजू-गोरगरिबांना हेरून त्यांना किडनी दान करण्यास भाग पाडणारे अनेक दलाल कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही रॅकेट्स अत्यंत गुप्त व नियोजितपणे आपले काम करतात.

Back to top button