भीमसेन जोशी संगीत महोत्सवाची सांगता; डॉ. किशोर देशमुख यांना ‘पं. भीमसेन जोशी’ पुरस्कार प्रदान | पुढारी

भीमसेन जोशी संगीत महोत्सवाची सांगता; डॉ. किशोर देशमुख यांना ‘पं. भीमसेन जोशी’ पुरस्कार प्रदान

पुणे : बहारदार गायन आणि वादनाने कलाश्री संगीत मंडळ आणि दी औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड यांच्या वतीने आयोजित नवव्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाची सांगता झाली.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीला विठ्ठलमळा गोशाळेचे संजय बालवडकर, ज्येष्ठ संगीततज्ज्ञ सुधीर दाभाळकर, मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, फाउंडेशनचे सचिव शिरीष नाईकरे, सुखलाल बोचडे आणि पं. विश्वास जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
यंदाचा ’भारतरत्न पं. भीमसेन जोशी’ पुरस्कार अकोल्यातील श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख डॉ. किशोर देशमुख यांना संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी प्रदान करण्यात आला.

कोरोनामुळे शालेय साहित्य महागले

त्यानंतर पं. हेमंत पेंडसे यांचे गायन झाले. त्यांनी राग मारवामध्ये विलंबित एकतालातील बंदिश ’पिया मोरे’ आणि द्रुत एकतालातील ’हो गुणी जण’ ही बंदिश गायली. त्यानंतर हमीर रागामध्ये द्रुत एकतालातील ’चंचल चपल’ ही बंदिश गायली. गायनाच्या शेवटी त्यांनी ’विष्णुमय जग’ हा अभंग गायला. त्यांना उदय कुलकर्णी आणि प्रणव गुरव यांनी साथसंगत केली.कार्यक्रमात नंदकिशोर ढोरे यांचे सोलो तबलावादन झाले. त्यांनी तीन तालातील घराणेदार पेशकार सादर केले. नंतर तीन तालातील मध्यलयातील पारंपरिक बंदिशी तसेच गत, परण, चक्रदार व रेला वाजवत वादनाचा समारोप केला. त्यांना गंगाधर शिंदे यांनी साथ केली. महोत्सवाचा समारोप पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग गौड मल्हार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Back to top button