पंतप्रधानांच्या व्यासपीठावर अजित पवारांचे भाषण वगळले | पुढारी

पंतप्रधानांच्या व्यासपीठावर अजित पवारांचे भाषण वगळले

पुणे : पुढारी वृत्तसेवा तीर्थक्षेत्र देहूमध्ये झालेल्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात राजशिष्टाचाराचा भंग झाला. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण वगळण्यात आले आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यापूर्वीच राजकारणाचा नवा रंग समोर आला. हा कार्यक्रम आटोपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच हेलिकॉफ्टरने मुंबईकडे रवाना झाल्याने सारे बघतच राहिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यावेळी मोदी यांनी पवार यांच्या खांद्यावर हातदेखील ठेवला व त्यांची चौकशीही केली. राजशिष्टाचारानुसार राज्याचे प्रतिनिधी आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पवार यांच्या भाषणाचा वेळ पंतप्रधानांच्या कार्यक्रमात नोंद होणे आवश्यक होते; परंतु पंतप्रधान कार्यालयाकडून तसे झाले नाही. देहूगाव संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मनोगते झाल्यावर सूत्रसंचालकांनी भाषणासाठी थेट मोदी यांचे नाव घेतले. ही वेळ सावरुन घेण्याचा प्रयत्न मोदींनी केला. माझ्या आधी तुम्ही बोला, असा आग्रह त्यांनी अजित पवार यांना केला. मात्र, पंतप्रधान कार्यालयानेच फुली मारलेली असल्याने उपमुख्यमंत्र्यांनीही नम्रपणे बोलण्यास नकार दिला. शेवटी पंतप्रधान बोलण्यास उभे राहिले.

पीएमओचाच नकार?

मार्च महिन्यात मेट्रोच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी मोदी यांच्यासमोर थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. हा प्रसंग लक्षात ठेवून अजि पवार यांना देहूत भाषणापासून पंतप्रधान कार्यालयाने म्हणजेच पीएमओने रोखले असावे, अशीही चर्चा आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा दिल्‍लीतूनच पंतप्रधान कार्यालयाने ठरवली. त्यात देहू संस्थानचा कोणताही सहभाग नव्हता, असे स्पष्टीकरण देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनीही नंतर दिले.

हा महाराष्ट्राचा अपमान

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावे, अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती; पण पीएमओने त्याला काही उत्तर दिले नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिले नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी तीव्र प्रतिक्रिेया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्‍त केली.

आणि हेलिकॉप्टर गमन

राजकारण कोणत्याही क्षणी कसे वळण घेईल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणाचा कोणताही भरवसा देता येत नाही. याची प्रचिती देहूतील या वादानंतरही आली. राजशिष्टाचाराचा भंग करून भाषण रद्द केल्याने संतप्‍त झालेले अजित पवार कार्यक्रमानंतर तडक निघून जातील, असा अंदाज होता. परंतु, शीळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आटोपल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरनेच अजित पवार मुंबईला रवाना झाले आणि सर्वांनाच त्यांचा पहाटेचा शपथविधी आठवला. अजित पवार पुन्हा फडणवीसांसोबत अशी कोटीही माध्यम प्रतिनिधींमध्ये हशा पिकवून गेली.

हेही वाचा

Back to top button