राज्यसभेची पुनरावृत्ती विधानपरिषदेला होणार नाही : गृहराज्यमंत्री सतेज पाटील | पुढारी

राज्यसभेची पुनरावृत्ती विधानपरिषदेला होणार नाही : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीत महाआघाडीचे नेते काहीसे बेसावध राहिले. पण विधानपरिषद निवडणुकीत असे होऊ देणार नाही, भाजपचा पराभव व महाआघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वास गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.

पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काही अडचणी आल्या. त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. राजकारणात हार-जीत होत असते. त्यातून शिकून सावध होऊन पुढे चालायचे असते. त्यामुळे राज्यसभेच्या अनुभवावरून महाआघाडीचे नेते सावध झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी होतील, याची सर्व तयारी आम्ही केली आहे.

ते पुढे म्हणाले, भाजप नेते व माजी मंत्री चंद्रकांत पाटील हे एखाद्या यशाने हुरळून जाऊन विधान परिषदेलाही पुन्हा तसेच होईल, याप्रमाणे बोलत आहेत. पण राज्यसभेची पुनरावृत्ती महाआघाडीचे नेते कदापिही होऊ देणार नाही. आम्ही काय डोळे झाकून बसलेलो नाही, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. कोल्हापूरमधील आमच्या विरोधकांनाही प्रत्यक्ष महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणातच जागा दाखवून देऊ.

भाजपकडून ईडीचा गैरवापर सुरू आहे. विरोधात बोलणार्‍या विरोधात सुडाचे राजकारण करून चौकशी केली जात आहे. पूर्वी पाच-सहा लोकांना माहीत असलेली ईडी आता भाजपच्या या कृत्यामुळे गल्ली-बोळात माहीत झाली आहे, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.

उपमुख्यमंत्र्यांना बोलू द्यायला हवे होते

मंत्री पाटील म्हणाले, देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमास महाआघाडीकडून प्रोटोकाल म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वागतास उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमास पवार यांना महाराष्ट्राची बाजू मांडू दिली नाही. आम्ही प्रोटोकाल पाळला, त्यांनाही तो पाळण्याची गरज होती.

Back to top button