पुढारी ऑनलाईन : आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री कळली पण जोतिबाची सावित्री अजूनही कळली नसल्याचे वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले आहे. हेरवाडच्या धर्तीवर पुण्यातील खडकवासला येथील विधवा प्रथाबंदी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
वटपौर्णिमेनिमित्त बोलताना चाकणकर म्हणाल्या, महिला वडाला फेरे मारतात आणि पुढच्या सात जन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण लग्न झाल्यापासून एकदाही मी वडाला फेऱ्या मारल्या नाहीत. माझ्या नवऱ्याने कधी तसा हट्ट केला नाही की, सासरच्या मंडळींनी मला कधी आग्रह देखील केला नाही. समाजात अजूनही अनेक अनिष्ट रूढी प्रथा परंपरा प्रचलित असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वडाच्या फांद्या तोडून, वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून निसर्गाचा समतोल बिघडवण्यापेक्षा चार वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केल्याचा आनंद निश्चितच समाधानकारक असेल. चला, वटपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण करुया..! असेही आवाहनही त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.