‘भांडकुदळ बायको सात सेकंदही नको’; पत्नी पीडितांनी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारत साजरी केली वट पौर्णिमा | पुढारी

‘भांडकुदळ बायको सात सेकंदही नको’; पत्नी पीडितांनी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारत साजरी केली वट पौर्णिमा

वाळूज महानगर (औरंगाबाद) ; पुढारी वृत्तसेवा : वट पौर्णिमेला बायका आपल्या पतीला दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. वटवृक्षाला फेऱ्या मारत जन्मोजन्मी हा पती मिळू दे, अशी प्रार्थना करत वडाला फेऱ्या घालतात. पण पत्नी पीडितांनी याचा निषेध नोंदवत सात जन्म काय, सात सेकंदही भांडकुदळ बायका नको, असा गजर करत पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारून सोमवारी (दि.१३) पिंपळ पौर्णिमा साजरी केली.

पत्नी पीडितांच्या आश्रमातील उपक्रम

करोडी येथे जवळपास सहा वर्षापूर्वी पत्नी पीडितांसाठी आश्रम सुरु करण्यात आले असून या आश्रमात अनेक पत्नी पीडित पुरुष सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. आश्रमात गेल्या सहा वर्षांपासून वटसावित्री पोर्णिमेच्या एक दिवस अगोदर पिंपळ पोर्णिमा साजरी करण्यात येते. सोमवारी पत्नी पीडित पुरुषांनी या आश्रमाच्या प्रांगणात असलेल्या पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारून ‘हे मुंजा राया वट सावित्रीच्या दिवशी आमच्या बायका तुला खोटे साकडे घालतील त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नकोस, अशा भांडखोर बायका आम्हाला सात जन्म तर काय पण सात सेकंद देखील नको,‘ असे साकडे यावेळी घातले.

यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडूळे, सोमनाथ मनाळ, चरणसिंग घुसिंगे, भिक्कन चंदन, संजय भांड आदींची उपस्थिती होती.

पुरुषांसाठी आयोगाची मागणी

आपल्या बाजूने असलेल्या कायद्याचा आधार घेत काही भांडखोर महिला याचा गैरवापर करत आहेत. यामुळे लिंगभेद न करता कायदे करण्यात यावे, पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा, अशी मागणी भारत फुलारे यांनी यावेळी केली.

Back to top button