पुणे, पुढारी वृत्तसेवा: रेल्वे प्रशासनाकडून हडपसर येथे नुकतेच नवे टर्मिनल उभारण्यात आले आहे. त्याच्या विकासाचे काम आता सुरू होणार असून गाड्यांची संख्या वाढल्यावर येथेच रेल्वे गाड्या पार्किंगसाठी कारशेड उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीचा मोठा भार येथे पडला आहे.
हा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नुकतेच हडपसर येथे नवे टर्मिनल उभे केले आहे. या टर्मिनलवरून सुरुवातीला फक्त एक गाडी धावत होती. आता येथून तीन गाड्या सुटतात. आगामी काळात पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार आणि रेल्वे गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनल येथे गाड्या वाढविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे गाड्या वाढल्या, की त्यांच्या पार्किंगसाठी कारशेड उभारण्यात येणार आहे.
हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनाला निधी मिळाला असून, टर्मिनलच्या विकासाचे काम आता रेल्वे प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाप्रमाणेच सर्व सोयीसुविधा प्रवाशांना हडपसर टर्मिनल येथे मिळतील.
स्टेबलिंग लाइनचे काम सुरू
आगामी काळात हडपसर टर्मिनल येथून आणखी रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन आहे. त्याकरिता प्रशासन येथील पार्किंग परिसराचा विकास करणार आहे. तत्पूर्वी, रेल्वे प्रशासनाने येथे आता स्टेबलिंग लाइन (रेल्वेगाडी उभी करण्याचा पर्यायी मार्ग) तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
टर्मिनल उभारल्यानंतर तिथपर्यंत जाण्यासाठी सध्याच्या घडीला खूपच अरुंद रस्ता आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणार्या गाड्या टर्मिनलपर्यंत जात नाहीत. त्यामुळे सार्वजनिक वाहने या ठिकाणी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा