

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात डाॅक्टरांसह तेथील कर्मचारी वर्गाशी हुज्जत घालून त्यांना अश्लिल शिविगाळ करत दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात प्रदीप सुरेश नकाते (रा. प्रगतीनगर, बारामती) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळ्यासह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ति आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अधिपरिचारक अमोल नारायण जामकर यांनी याबाबत फिर्याद दिली. ही घटना ९ जून रोजी सायंकाळी घडली.
फिर्यादी हे अपघात विभागात काम करतात. घटनेच्या दिवशी त्यांच्यासोबत डाॅ. प्रिया हरिदास, जीवनज्योती डिसिल्व्हा हे ड्युटीवर होते. यावेळी प्रदीप नकाते हे पत्नीला पोटात दुखत असल्याने तेथे उपचारासाठी घेऊन गेले. डाॅ. हरिदास यांनी तपासणी केल्यानंतर रुग्णाची सोनोग्राफी करण्याची आवश्यकता आहे, तुम्ही सोनोग्राफी करून घ्या, त्यानंतर पुढील उपचार करता येतील असे सांगितले. त्यावर नकाते यांनी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना, तु पेशटंवर उपचार करणार आहेस की नाही, इंजेक्शन देणार आहे की नाही, असे बोलत अश्लिल भाषेत शिविगाळ दमदाटी सुरु केली. फिर्यादीने त्यांना मॅडम यांना शिविगाळ करू नको, असे सांगितले. त्यावर त्यांनी चिडून फिर्यादीलाही शिविगाळ करत त्यांच्या अंगावर धावून आले. हाॅस्पिटलमधील खुर्च्या फेकून दिल्या. टेबल व बेड पलटी करून नुकसान करत फिर्यादी व त्यांचे सहकारी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.