पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातून जाणार्या पालखी मार्गावर आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी,' अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकार्यांना केली आहे. आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी पाण्याचे नमुने तपसावेत, बाहेरून येणार्या खासगी टँकरमधील पाणी ओटी टेस्ट करावे, तसेच पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींमध्ये जंतूनाशक पावडर आहे की नाही याची खात्री करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
आषाढी वारीसाठी दि. 20 व 21 जूनला आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, तर देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी मार्गावरील एक कि.मी. अंतरावरील सर्व पाण्याचे सर्वेक्षण करून त्याची तपासणी प्रयोगशाळेत करून घेणे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जंतूनाशक पावडर आहे की नाही याची खात्री करणे, पालखी आगमनापूर्वी सात दिवस अगोदर नियमितपणे सेवा देणार्या ठिकाणांची, तसेच टँकर फिलिंग पॉइंटची पाहणी करणे, त्यासाठी पथकांची निर्मिती करण्याच्या सूचना प्रसाद यांनी केल्या आहेत.
पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांतील 10 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पालखी सोहळा नियंत्रण रूम स्थापन करून ती 24 तास सुरू राहील याचे नियोजन करावे. फिरत्या पथकामध्ये कोरोना चाचणीची सोय उपलब्ध करावी. पालखी तळावर स्त्रीरोग तज्ज्ञदेखील उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचनाही प्रसाद यांनी दिल्या आहेत.